पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर मध्यरात्री हा अपघात घडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत ‘पोर्शे’ कार चालवत धनाढ्य बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दुचाकीवर जात असलेल्या दोघांना उडवले होते. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. हे ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना आता आमदाराच्या पुतण्याकडून तशाच प्रकारचा अपघात झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
या अपघातात ओम भालेराव (वय १९ वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांचे पुतणे मयुर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मयूर मोहिते नारायणगावहून खेडच्या दिशेनं जात होते. मयूर मोहितेची गाडी कळंबजवळ पोहोचताच मंचरवरुन येणाऱ्या दुचाकीला मयूरच्या भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकी हवेत उडाली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. महत्त्वाची बाब म्हणजे, मयूर मोहिते एवढ्या वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवत होते की, त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूनं गाडी चालवणं अपेक्षीत होतं. पण मयूर मोहितेची गाडी रस्त्याच्या उजव्या बाजुला आली आणि तिनं दुचाकीला जोरदार धडक दिली. मयूर मोहितेनं दुचाकीला दिलेली धडक अत्यंत जोरदार होती. दुचाकी हवेत उडाली आणि पार चक्काचूर झाला. दुचाकीचे पार्ट्स तब्बल २० फुट अंतरापर्यंत विखुरलेले आहेत. प्रथमदर्शनी तरी अपघात मयूर मोहिते यांच्याच चुकीमुळं झाल्याचं बोललं जात आहे.
आमदार दिली मोहितेंच्या पुतण्यावर अपघाता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३०४/२ मृत्यूस कारणीभूत, मात्र मृत्यू घडवून आणण्याच्या हेतू शिवाय, कलम २७९ बेदरकारपणे वाहन चालवणं, कलम ३३७/३३८ दुखापत, मोटार वाहन कायदा कलम १८४ तत्परतेनं मदत न करणं, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे मयूर मोहिते?
मध्यरात्रीच्या वेळी ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मयूर यांनी मद्यपान केलेलं होतं. त्याचबरोबर मयुरनं अपघातानंतर इथून पळ काढला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. परंतु आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मात्र, स्थानिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मयूर इंजिनिअर आणि उद्योजक आहे. आजवरच्या आयुष्यात त्यानं कधीच दारूला स्पर्श केलेला नाही. तो घटनास्थळावरुन पळूनही गेला नाही, असं आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
मयूर दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू साहेबराव मोहितेंचा मयूर मोहिते पाटील मुलगा आहे. आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुतण्या मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतो. तो इंजिनिअर असून सध्या कुटुंबाचा व्यावसाय सांभाळतो. तसेच, मयूर सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची तयारी करत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
मयूरला न्यायालयीन कोठडी
मयूर मोहिते पाटीलला न्यायालयीन सुनावणी मध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली त्याच्या विरुद्ध 304 कलमानुसार गुन्हा दाखल होऊनही पोलीस कोठडी मिळाली नाही. त्यामुळे दिलीप मोहिते पाटलांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे..
दरम्यान, अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, तो दारू प्यायला नव्हता, असा दावा आमदार दिलीप मोहितेंनी केला. अपघात प्रकरणात आपण पोलिसांवर कुठलाही दबाव आणला नाही असेही दिलीप मोहिते म्हणाले होते. परंतु, प्रत्यक्षात मयूर मोहिते पाटील ला न्यायालयीन सुनावणी मध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली त्याच्या विरुद्ध 304 कलमानुसार गुन्हा दाखल होऊनही पोलीस कोठडी मिळाली नाही. त्यामुळे दिलीप मोहिते पाटलांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे..
पोलिसांनी कठोर कलमं लावून, न्यायालायत भक्कम बाजू मांडली असती तर नक्कीच मयुरला पोलीस कोठडी मिळाली असती. मात्र, सुरुवातीपासून पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं आणि निःपक्षपातीपणे कारवाई करत नसल्याचं बोललं जात होतं.