"Ko Jagarti"-Remembrance of Kojagiri Poornima

“को जागर्ति”-आठवण कोजागिरी पौर्णिमेची

महाराष्ट्र लेख
Spread the love

“को जागर्ति ,को जागर्ति” असं म्हटल्यावर आपल्याला आठवण येते कोजागिरी पौर्णिमेची. गीतेत भगवंताने ‘नक्षत्राणांमह शशी ‘असे म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे. पण चंद्रासमोर तासानतास बसून बघू शकतो. व्यक्ती पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाली तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येऊ शकतो . (“Ko Jagarti”-Remembrance of Kojagiri Poornima)

चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शितल आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकाही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की “रसात्मक सोम बनवून मी सर्व औषधेंना पुष्ट करतो.  पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मक”  अशी आख्यायिका आहे चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ,समुद्रमंथनात तो तिच्या पाठोपाठ आला.त्याची आणि लक्ष्मी मातेची जन्म तिथी एकच ती म्हणजे पौर्णिमा त्यामुळे या तिथीवर दोघांचे पूजन करून त्यांना दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चंद्राचे शितल चांदणे पडलेले दूध नैवेद्य म्हणून प्रशान केले जाते.

प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु गरीब ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले.

पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने नांदू लागला अशी कथा वाचण्यात आली.

हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोजागिरीत चंद्र पाहून दूध पिण्याची विशेष परंपरा भारतात आहे.  समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली, म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. जो व्यक्ती या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करतो त्याला कधीही धन आणि ऐश्वर्याची कमतरता भासत नाही. असेही म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमेला खान्देश मध्ये आम्ही “भुलाबाईचे गाणी म्हणत आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थचां नैवद्य दाखवत असू,आणि भुलाबाईचं विसर्जन करीत असू, रात्री गच्ची वर जाऊन  मसाला दूध आटून त्यात चंद्र पाहून ते आनंदाने पिणे हि आपली सर्वांची च कोजागिरी बद्दल कल्पना. अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो, म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात.

हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असल्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते.

या दिवशी शेतात तयार झालेल्या, पिकवलेल्या धान्याचे जेवण म्हणजेच नवान्न केले जाते. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला चंद्र यांची या रात्री पूजा केली जाते. शरद ऋतुतल्या पौर्णिमेला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून आपण सर्वजण ग्रहण करतो. अशा पद्धतीने आपण हा सण साजरा करतो.

कोजागिरी पौर्णिमेला  शरद पौर्णिमा, माडी पौर्णिमा, लोख्खी पुजो, कौमुदी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी पितळ, चांदी, तांबे किंवा सोन्याने बनवलेल्या कोणत्याही लक्ष्मीच्या मूर्तीला झाकून विविध प्रकारची पूजा करण्याची प्रथा आहे. रात्री चंद्र उगवल्यावर 11 तुपाचे दिवे लावावेत. आजच्या रात्री आई लक्ष्मी आपल्या भक्तांना शोधते. असे म्हटले जाते.

पौर्णिमेला लक्ष्मी सहस्त्रनाम, लक्ष्मी अष्टावली, सिद्धिलक्ष्मी कवच, श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त, महालक्ष्मी कवच, कनकधारा यासारखे पाठ केल्यानं लक्ष्मीची कृपा होते. पौर्णिमेला आवळ्याची पूजा केल्यानंही लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. शरदाच्या चांदण्या रात्री आवळ्यातील औषधी गुण अधिक वाढतात.दुधाचा नैवेध दाखवतात.

कोजागिरीला रस्ते स्वच्छ करावे. घरे सुशोभित करावीत, दिवसा उपवास करावा. आपल्या दारासमोर दिवा लावून पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा. ज्याच्याकडे गायी असतील त्यांनी गायीची पूजा केली जाते. अश्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.

कोजागिरी पौर्णिमेला रात्री जागरण का करावे?

अश्विन महिन्यामध्ये पावसाळा संपण्यास सुरुवात होऊन थंडीचा हंगाम सुरू होतो. यावेळी दिवसा गरम वातावरण असते. आणि रात्री थंड वातावरण असते. अशा परिस्थितीमध्ये दूध प्यायल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच कोजागिरीचे थंड चांदणे शरीरावर घेतल्यामुळे मानसिक शांती, मानसिक शक्ती आणि चांगले आरोग्य लाभते. म्हणून देखील कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवली जाते.

कोजागिरी पौर्णिमा हे व्रत बरेच लोक पाळत असतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात.  देव, पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते सर्वांसोबत स्वतः सेवन करावी. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे बळ देतात आणि ते दूध मग पितात. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते.

प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते.

या रात्री चंद्र त्याच्या संपूर्ण 16 टप्प्यात आपल्याला दिसतो.  त्याची किरणे विशेष अमृत गुणांनी संपन्न असतात. या दिवशी कुर्डूची फुले, नाचणी, वरी, झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. तसेच नवीन धान्य देखील या दिवशी घरात आणले जाते. या दिवशी धान्याची पूजा करून नवीन तांदळाचा भात आणि खीर बनवण्याची प्रथा देखील दिसून येते.

कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात  आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो. अशी ऐकून माहिती आहे.

आदिवासी जनजातीत महत्व

भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.

कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून ‘शरद पुनम’ नावाने साजरी केली जाते. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.  या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठविण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे.

हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात. ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला ‘कुमार पौर्णिमा’ असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते.

कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक ‘लोख्खी पुजो’ असे म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो.

तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात .

शेवटी एवढंच त्या लक्ष्मीला म्हणावं आम्हाला नेहमीच जागृत ठेव “अखंड हिंदुस्थानाच स्वप्न साकार करण्याकरीता, जोपर्यत ते साकार होत नाही तोपर्यंत आम्हाला सतत विचारात रहा  “को जागर्ति, को जागर्ति”

सौ.आरती राजेश धर्माधिकारी

सी.बी.डी(नवी मुंबई)

९०७६१८९३५५.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *