Only Dnyaneshwari will bring the world out of the trenches of war

ज्ञानेश्वरीच जगाला युद्धाच्या खाईतून बाहेर काढेल – श्रीपाल सबनीस

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे, दिः २८ ऑक्टोबर: “धर्मांच्या नावावर जगभरात सुरू असलेले युध्द हे माणासाच्या रक्ताचे आहे. धर्म हे अधर्मावर मार्गक्रमण करीत असून इस्त्राईल व पॅलेस्टाईनमधील सुरू असलेले युध्द महाभयंकर आहे. अशा मूल्यहिन समाजामध्ये हे विश्वची माझे घर म्हणणारे संत ज्ञानेश्वर यांची सार्थ श्रीज्ञानेश्वरी हीच जगाला युध्दाच्या खाईतून बाहेर काढेल” असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि मुक्ता आर्टस पब्लिकेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक लक्ष्मण सूर्यभान घुगे लिखित ‘सार्थ श्रीज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे प्रकाशन कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
या प्रसंगी विश्व वारकरी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब महाराज ढगे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
या वेळी एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“समाजातील प्रश्नांची उकल युध्दातून नाही तर अध्यात्म आणि विज्ञानातून होईल. याग्रंथामध्ये लेखकाने माऊलीची भूमिका मांडली आहे. मानवजातीचे कल्याण व्हावे या साठी ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहीली. त्यामुळे हा ग्रंथ विश्वातील संपूर्ण मानवासाठी आहे. ज्ञानेश्वरांचे कर्तृत्व माऊली या एका शब्दात व्यक्त होते. कर्म आणि भक्तीचा विचार त्यांनी मांडला आहे. त्यांनी त्या काळात मानवजातीचा उद्धार व्हावा यासाठी क्रांतिकारी भूमिका घेतली होती. अशा संताला देव्हार्‍यातून बाहेर काढून जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या लेखकाने केले आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ज्ञानमयो विज्ञानमयो या तत्वानुसार मानवाचे कल्याण होईल. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. ती अदृश्य स्वरूपात कार्यरत असून जीवन सुखमय करीत आहे. संत ज्ञानेश्वरांनी जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोण मांडला आहे. कर्म व भक्तीचा विचार ज्ञानेश्वरीत असून केवळ कर्तव्य करीत राहण्याचा मंत्र त्यांनी दिला आहे.”
हभप बापूसाहेब महाराज ढगे म्हणाले,“सर्वसामान्यांना ज्ञानेश्वरांची भाषा कळत नाही, आणि लवकर ही आकलन होत नाही. परंतू लेखकांनी ज्ञानेश्वरीची भाषा समाजापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे. माऊलींची इच्छा झाली आणि लेखकांनी कमी वेळेत, सुदंर भाषेत व सर्वांना कळेल अशा शब्दात लिहिले आहे. त्यांच्या लेखणीतून अन्य संतांचेही विचार समाजापर्यंत पोहोचावे.”
लेखक लक्ष्मण घुगे म्हणाले,“या ग्रंथात ज्ञानोबा माऊलींच्या अमृतरूपी ओव्यांचा, सुख सोहळा अर्थात अमृतात न्हालेली, कथारुपातून आणि स्वतंत्र चिंतनातून मांडलेली व समाजायला सोप्या भाषेत आहे.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी स्वागतपर भाषण केले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *