शि.प्र. मंडळीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची निवड : उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात नुकतीच पार पडली असून सभेमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची अध्यक्षपदी पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी म्हणजेच २०२३-२०२८ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार, अनिलकुमार रुईया, डॉ.पवन पोदार यांची नियुक्ती झाली आहे.

संस्थेच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या सभेचे अध्यक्षपद सूर्यकांत पाठक यांनी भूषविले. सभेस शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे व इतर नियामक मंडळ सदस्य देखील उपस्थित होते. तसेच शि.प्र. मंडळीचे ज्येष्ठ सभासद डॉ.न.म.जोशी, ज.गं.फगरे यांसह पुणे व सोलापूर येथून देखील इतर सदस्यही सभेला होते.   अ‍ॅड.एस.के.जैन, अ‍ॅड.नंदू फडके, गजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या चिटणीस राधिका इनामदार सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण चितळे यांनी आभार मानले. सरस्वती वंदनेने सभेची सुरुवात आणि पसायदानाने सांगता झाली.

अ‍ॅड.नंदू फडके गेली ४२ वर्षे वकिली व्यवसाय करीत आहेत. प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी अनेक कामे बघितली आहेत. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे अनेक वर्षे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. तसेच गेली १० वर्षांहून अधिक काळ ते भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे गेली ५ वर्षे अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत.

गजेंद्र पवार हे बांधकाम व्यावसायिक असून पिनॅकल ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, महाराष्ट्र हौसिंग कॉर्पोरेशन, क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमी यांसारख्या अनेक संस्था व संघटनांवर ते कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून निरामय ट्रस्ट पुणेचे विश्वस्त म्हणून काम पहात आहेत, अशी माहिती शि.प्र.मंडळी संस्थेच्या चिटणीस राधिका इनामदार यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *