हे तर अजबच! केंद्रावरील गर्दीमुळे लस संपल्याचे सांगितले आणि घरी आल्यावर लसीकरण झाल्याचा आला मेसेज

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : लस घेण्यासाठी कोविन अॅपमध्ये नोंदणी होत नाही, झालेल्यांना लस उपलब्ध नाही यामुळे ग्रासलेल्या नागरिकांना दररोज वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. पुण्यात आज एक विचित्र अनुभव जेष्ठ नागरिकांना आला. अॅपवरुन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे लस संपल्याचे त्यांना सांगितले गेले. घरी आल्यावर त्यांच्या आप्तेष्टांना संबंधितांचे लसीकरण झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. दरम्यान,अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांची ससेहोलपट होत असून प्रशासनाने असे प्रकार रोखवेत व अॅपमधे काही तांत्रिक दोष असल्यास त्याबाबत आवश्यक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अतुल भिडे यांनी त्यांचे वडील (वय 88) आई (वय 86) व सासरे वय (88) यांच्यासाठी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट नऱ्हे सिंहगड कॉलेज येथे 30 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 1 अशी मिळाली.

अतुल भिडे तिघांनाही घेऊन पावणे अकरा वाजता पोहोचले तेव्हा तेथे प्रचंड गर्दी होती. तेथील अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट पत्रही दाखवले परंतु त्यांनी सांगितले की तुम्हाला रांगेतच यावे लागेल वेगळी सोय नाही. रांगेतील लोक सकाळी सहापासून उभे आहेत. अतुल भिडे नाईलाजास्तव रांगेत उभा राहिले परंतु थोड्याच वेळात लस संपल्याचे जाहीर करण्यात आले त्यामुळे भिडे तिन्ही वृद्ध लोकांना घेऊन घरी आले.

अतुल भिडे यांनी घरी येऊन कोविनॲप उघडून पाहिले तेव्हा असे दिसले की या तीनही लोकांच्या नावावर लस दिल्याचा दाखला दिसत होता. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे दुसऱ्या डोससाठी अपॉइंटमेंट घेता येणे शक्य नाही.

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी अतुल भिडे यांचा हा अनुभव जाहीर कार्यक्रमात सांगितला. प्रशासनाने आजवर आलेल्या लसी व त्यांचे एकूण सर्वच केंद्रावर झालेल्या वाटपाचा तपशील जाहीर करावा अशी मागणी करुन प्राप्त लसींचे सर्व केंद्रावर समान वाटप केले जावे व ज्यांनी अॅप वर अपॉइंटमेंट घेतली आहे अशांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *