पुणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना करीत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठच्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण यांसह पोलीस दलातील अधिकारी देखील उपस्थित होते. प्रख्यात सनई वादक प्रमोद गायकवाड व नम्रता गायकवाड यांनी गणरायाचरणी वादनसेवा अर्पण केली. तर, प्रभात बँडच्या मोजक्या वादकांनी सादरीकरण केले.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत श्रीं चे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा आॅनलाईन पद्धतीने अनुभविला. लेकरांनो तुमच्या वरचं संकट घेऊन चाललोय… असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिरात काढण्यात आली. गणेशाने कोरोनारुपी राक्षसाचा वध केल्याचे दृश्य रंगावलीत साकारण्यात आले.