पुणे -बारावीचे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रिया पुरंदरे असे या मुलीचे नाव असून ती पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीमधील डी १०३ या फ्लॅटमध्ये राहात होती. श्रियाच्या आत्महत्येचं कारण अद्याप पर्यंत समजू शकलं नसल्याचे हवेली पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (रविवार) सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ती गॅलरीत गेली होती. त्याच वेळी तेथील अभिजीत देशमुख यांना खाली काही तरी जोरात पडल्याचा आवाज आला. अभिजीत यांनी खाली पाहिले असता, त्यांना श्रिया पडल्याचे दिसून आले. त्यावर तिला तत्काळ रूग्णालयात नेले असता, तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले.
श्रियाला दहावीला तब्बल 95 टक्के गुण मिळाले होते. मिळालेल्या माहितीनुसार श्रिया अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. तिच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून ती घोडेस्वारीचे धडे घेत होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने हॉर्स रायडिंगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.