श्रीगुरुपौर्णिमा उत्सव

महाराष्ट्र लेख
Spread the love

आपल्या हिंदू संस्कृतीत निरपेक्ष कर्तव्याची भावना श्रेष्ठ मानली जाते. प्राचीन शिक्षणपद्धतीत आचार्य शुल्क किंवा मोबदला घेत नसत. किंबहुना गुरूचे शिष्याशी असलेले नाते आजच्या शिक्षक-विद्यार्थ्यासारखे नव्हते. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य दक्षिणा देत असे. अशी दक्षिणा हे गुरु व आश्रम यांच्या विषयीच्या कृतज्ञतेचे छोटेसे प्रतीक होते. कारण आचार्यांचे ऋण ही कधीही न फिटणारी गोष्ट असते.

क्वचित प्रसंगी गुरु शिष्याला अत्यंत अवघड, अशक्य कोटीतल्या गोष्टीची दक्षिणा म्हणून मागणी करीत असे. श्रीकृष्ण आणि बलराम आचार्य सांदिपनींचे शिष्य होते. सांदिपनी ऋषींचा पुत्र कौशिकाचे सागरावर संचार करणार्‍या बलाढ्य असुरांनी अपरहरण केले होते. शिक्षण पूर्ण होताच कृष्ण आणि बलराम आधी त्या मोहिमेवर गेले. असुरांचा पराभव करून त्यांनी कौशिकाची सुटका केली. आचार्य सांदिपनींना कृष्ण-बलरामांनी दिलेली ही गुरुदक्षिणा. त्याचे मोल पैशात शक्य नाही. गुरूने इच्छा व्यक्त करावी आणि शिष्याने ती पूर्ण करावी असा संकेत होता.

चंद्रगुप्त हा आचार्य चाणक्यांचा शिष्य. भारतात एकछत्री राज्य स्थापन व्हावे व आक्रमकांना भारतावर आक्रमण करण्याची हिंमत होऊ नये असे साम्राज्य उभे करण्याची आकांक्षा आचार्यांची होती. चंद्रगुप्ताने हे अशक्यप्राय वाटणारे आव्हान स्वीकारले. पूर्ण केले. चाणक्यही शिष्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घेऊन निघून गेले. चंद्रगुप्तानेही यथाकाल आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करून संन्यास स्वीकारला.

गुरूच्या प्रेरणेने अशा असंभव वाटणार्‍या गोष्टी शक्य होतात. संघाचे स्वयंसेवक भगव्या ध्वजापुढे नतमस्तक होऊन अशी प्रेरणा प्राप्त करतात.

ज्या ज्या वेळी समाजावर संकट येते त्या त्या वेळी स्वयंसेवक कुणीही न सांगता धावून जातो व त्या कार्यात स्वतःला झोकून देतो. पाकिस्तानबरोबर आपली तीन युद्धे झाली. 1947 च्या पहिल्या युद्धात केवळ 48 तासात विमाने उतरू शकतील असा विमानतळ जम्मूच्या पर्वतीय भागात स्वयंसेवकांनी बांधला होता. हे कार्य मोलाचे, मजूर लावून कधीच झाले नसते. 1965 च्या दुसर्‍या युद्धात राजधानीच्या व्यवस्था व प्रशासनाचे कार्य सहजपणाने स्वयंसेवकांनी सांभाळले.

1971 च्या सर्वंकष युद्धाच्या वेळी तर आघाडीवर तोफांचा आणि मशिनगन्सचा भडीमार चालू असताना किशोरवयातील स्वयंसेवक थेट खंदकापर्यंत जात. जखमी जवानांना मदत करीत. त्यांच्यासाठी गरम पेय घेऊन जात. हे तर साक्षात मृत्यूच्या मुखातले धाडस असे. लष्करातील अधिकार्‍यांना प्रश्‍न पडे की इतके प्रशिक्षण यांना कसे, कोणी दिले ? आपण जाणतो की संघशाखेत काही लष्करी शिक्षण नसते, तरीही असे कार्य यशस्वी-पणे करण्याचे सामर्थ्य कुठून मिळते ? ते मिळते समर्पणाच्या भावनेतून. एका अर्थाने सहजपणे ती गुरूदक्षिणेची पूर्ती असते.

भगवा ध्वज

1) राष्ट्रजीवनात ध्वजाचे स्थान – स्फूर्ती केंद्र, ऐक्य व दृढतेसाठी ध्वजाचे सर्वाधिक महत्त्व. हे विजय चिन्ह आहे. विजिगिषू वृत्तीचे प्रतीक आहे. यश, सफलता व सन्मानाची निशाणी आहे.

2) ध्वज पूर्वजांकडून प्राप्त होतात – ध्वज आपोआप ठरत नाही. त्यामागे राष्ट्राचा इतिहास, परंपरा व जीवनदृष्टी असते. आधुनिक अनेक राष्ट्रांच्या ध्वजामागे केवळ राजकीय घटनांचा आधार आहे. कारण ती राष्ट्रेच नव्याने निर्माण झाली आहेत. परंतु आपले राष्ट्र प्राचीन आहे. यामुळेच प्राचीन भगवा ध्वज आपला राष्ट्रध्वज आहे.

3) भगवा ध्वज हा राष्ट्रातील पुरातन ध्वज – वेदात ‘अरुणः सन्तु केतवः’ असे वर्णन आहे. त्याच्या केशरी रंगाचे हे वर्णन आहे. प्राचीन काळापासून जनमेजयापर्यंत सर्व चक्रवर्ती, सम्राट, महाराजे व सेनापतींकडे हाच ध्वज होता. उदा. श्रीराम, अर्जुन, चंद्रगुप्त मौर्य, शाकारी विक्रमादित्य, स्कंदगुप्त, यशोवर्मन, हर्षवर्धन, पृथ्वीराज, महाराणा प्रताप, छ. शिवाजी महाराज इ. शीख बंधूचा हाच ध्वज आहे.

4) भगव्या रंगाचे महत्त्व – उगवत्या सूर्याप्रमाणे नियमितता, त्याग, पावित्र्य व तेजाचे प्रतीक, यज्ञ ज्वालेतून निघणार्‍या अग्निशीखांचे प्रतीक. प्राचीन काळी जनकल्याणासाठी तपसाधना करणारे ऋषिमुनी व संन्याशांचे वस्त्र, त्यांचा आदर्श समोर ठेवणारा ध्वज.

5) तिरंगा भारतात कसा आला ? इथले क्रांतिकारक जेव्हा फ्रान्स, इटली येथे गेले, तेव्हा त्यांचे ध्वज तिरंगी होते. त्यावरून मॅडम कामांनी तिरंगा ध्वजाची कल्पना मांडली.

6) 1929 ची कराची काँग्रेस – या काँग्रेस अधिवेशनात ध्वजसमितीने आपल्या शिफारशीत राष्ट्रध्वज भगवा असावा असेच सुचविले होते. पण तुष्टीकरणामुळे पुन्हा त्यात बदल करून राष्ट्रध्वज तिरंगा केला गेला.

7) भारतीय राज्यघटनेनुसार – अशोकचक्रधारी तिरंगा ध्वज हा आपण राष्ट्रध्वज (सार्वभौम राज्याचा ध्वज) म्हणून स्वीकारला आहे. आपण राष्ट्रीय आहोत. त्यामुळे तिरंगा ध्वजाचा सन्मान करतो. त्याच्या मानसन्मानाची काळजी घेतो. राष्ट्रध्वज व राज्यध्वज हे दोन्ही आपणास वंदनीय आहेत.

संघाने भगवा ध्वज गुरूस्थानी का मानला ?

1) व्यक्ती स्खलनशील असते. परिपूर्ण नाही. म्हणून व्यक्तीऐवजी राष्ट्र व त्याच्या जीवनदर्शनाचे प्रतीक म्हणून भगव्या ध्वजास गुरूचे स्थान देण्यात आले.

2) त्याग, ज्ञान, पावित्र्य व तेजाचा संदेश देणारा सूर्य, यज्ञ व मातीचे प्रतीक.

3) आपला धर्म, संस्कृती व इतिहासाचे स्मरण देऊन साहस, स्फूर्ती, त्याग व बलिदानाची प्रेरणा देणारा.

श्रीगुरुदक्षिणा (समर्पण)

गुरु मनुष्य जीवनाच्या प्रवासात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘गुरुर्ब्रह्मा…..’ गुरूसंबंधी कृतज्ञता व्यक्त करणे व समर्पण भावाचे प्रतीक म्हणून गुरूदक्षिणा अर्पण करणे ही आपली प्राचीन पद्धती आहे. अनेक उदाहरणे- एकलव्य, आरुणी, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद इ.

संघामध्ये व्यक्तीच्या जागी तत्त्वनिष्ठेचा आग्रह. भगवा ध्वज आपला गुरु, राष्ट्राचे प्रतीक. व्यावहारिक जगात धनासंबंधी मोह व आसक्ती. स्वयंसेवकाचा समर्पण भाव प्रकट व बळकट करण्यासाठी वर्षातून एकदा गुरूदक्षिणा कार्यक्रम. हे पूर्ण 365 दिवसांचे समर्पण आहे. समर्पण चांगले करता यावे म्हणून गंगाजळीची पद्धत. प्राचीन संकल्पनेनुसार 1/10 वा उत्पन्नाचा भाग समाजास द्यावा. स्वयंसेवकाने एक महिन्याचे उत्पन्न समर्पण करावे ही अपेक्षा आहे. त्याचे परिणाम दोन्ही प्रकारे होतात. स्वयंसेवकाचा सपर्मण भाव दृढ होतो. तसेच संघटना आत्मनिर्भर होते. आपली विशिष्ट पद्धती आहे. गुरुदक्षिणा किती दिली यावर स्वयंसेवकात हीनतेचा किंवा अहंकाराचा भाव नसतो. हे दान, मदत किंवा सदस्यता शुल्क नाही. कर्तव्य भावनेने केलेले समर्पण आहे.

संघाने आजपर्यंत संघाच्या कामासाठी समाजाकडे पैसा मागितला नाही. प्रारंभीच्या काळात संघासाठी आपण लोकांकडे वर्गणी मागावी असे स्वयंसेवकांना वाटत असे. ते स्वाभाविकही होते. कारण अखेर कुठल्याही कामाची उभारणी करायची म्हटले की पैसा लागतोच. त्या काळात अनेक सार्वजनिक संस्था त्यांना लागणारा पैसा समाजातून गोळा करीत असत. संघाच्या कार्यासाठी लागणारे धनही स्वयंसेवकांनीच समर्पण भावनेतून द्यावे, त्यातूनच संघकार्याचा खर्च व्हावा ही कल्पना पू. डॉक्टरांनी समोर ठेवली. भगव्या ध्वजाचे गुरुपूजन करून आपल्या कमाईतून ध्वजासमोर आपली गुरुदक्षिणा समर्पण करावी ही भावना केवढी दिव्य आणि कृती त्याहून उदात्त.

संघाच्या व्यवहारातील प्रत्येक कृती हा दिव्यत्वाकडे, ईश्‍वराकडे नेणारा संस्कारच असतो.

प्रसन्न खरे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *