पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 9)


श्री नारायण बाबांनी प्रयत्नपूर्वक सन १६८० मध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला, परंतु त्याच वेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लीम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती, त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता. त्यामुळे पालखी समवेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते, अशावेळी श्री नारायण बाबांनी ज्ञानोबा- तुकाराम पालखीत आपल्यासमवेत आहेत, तेव्हा आपणास कळीकाळाचेही भय नाही. असे सांगून ज्ञानोबा- तुकाराम असा मोठ्याने गजर करण्यास सांगितले, हे ऐकून वारकरी व टाळकरी यांनी ज्ञानोबा -तुकाराम असा मोठ्याने गजर करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ज्ञानोबा-तुकाराम हा गजर सर्वच पालखी सोहळ्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्या काळात असा गजर केल्याने जणू काही ज्ञानोबा-तुकाराम आपल्या बरोबरच चालत आहेत अशी भावना वारकऱ्यांची होत असे व याचा त्यांना आधारही वाटत असे. एक प्रकारे ज्ञानोबा-तुकाराम या घोषणेचे जनक श्री नारायण बाबाच आहेत असेच म्हणावे लागेल.

अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती' : जिद्दी सविता

 श्री.हैबतबाबा आरफळकर हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे. त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता, ते ग्वाल्हेर येथील शिंदे सरकारमध्ये होते. इंग्रजी आमदानीत सन१८१५-१६ चे सुमारास ग्वाल्हेर राज्य खालसा करून संस्थानात रूपांतर झाले, त्यावेळी हैबतबाबा ग्वाल्हेर सोडून साताऱ्यास येण्यास निघाले, वाटेत त्यांना चोरांनी गाठले व एका गुहेत कोंडून ठेवले. त्यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा धावा केला, हैबतबाबा व आणखी काही लोकांना चोरांनी गुहेत कोंडून ठेवले, त्याच सुमारास चोरांच्या टोळीच्या नायकाला मुलगा झाला, त्या आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी गुहेतून सर्वांना सोडून दिले, त्यात श्री.हैबतबाबाही सुटले, हा श्रीज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे असे त्यांना मनोमन वाटले, त्यांनी प्रवासाचा मार्ग बदलला व ते आरफळला जाण्याऐवजी आळंदीकडे आले. त्यांनी आळंदीत ज्ञानेश्वरांची आराधना सुरू केली, समाधीसमोर रात्री धुपारती पासून शेजारतीपर्यंत भजनाचा त्यांचा नित्यक्रम होता, वारकऱ्यांमध्ये प्रचलित असणारी भजनी मालिका ही त्यांचीच. श्री विठ्ठलाच्या दरबारी जे नामदेवरायांचे स्थान आहे, तेच हैबतबाबांचे आळंदीच्या दरबारी स्थान आहे, आळंदीच्या महाद्वाराचे पायरीला हैबतबाबांचीच पायरी म्हणतात. एवढी उपासना हैबतबाबांनी आळंदीमध्ये केली होती.

अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 8)

(क्रमशः)

– डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love