पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग- 8)


संत तुकाराम महाराज सन १६४९ मध्ये सदेह वैकुंठगमनाला गेले,श्री तुकोबांचा विरह त्यांचे निकटवर्ती १४ टाळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता. तुकयांचे बंधू कान्होबा हे पुढे प्रथा चालवीत होते, पण तुकाराम महाराजांच्या विरहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांचेवर हळूहळू सोपवली. पुढे श्री कान्होबा यांचे निधनानंतर तर सर्वांना चुकल्या- चुकल्यासारखे होऊ लागले, दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी व काहीतरी समाधानाचा मार्ग काढण्याची जबाबदारी श्री नारायण महाराजांवर येऊन पडली, हा विचार होत असतानाच सन १६८० मध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराज निवर्तले, दुःखाची एक नवी लाट आली पण सन १६८० च्या ज्येष्ठ महिन्यात देहू गावात श्रीनारायण बाबांनी टाळकरी व वारकरी यांच्यासमोर श्री तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन पंढरीची वारी करण्याची कल्पना मांडली व ती सर्व टाळकरी व वारकरी यांच्या मनाला भावली व या कल्पनेने नवचैतन्य निर्माण झाले. खऱ्या अर्थाने सन १६८० च्या ज्येष्ठ वद्य नवमीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून जो सोहळा सुरू झाला हाच खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याचा आरंभ होय.

अधिक वाचा  भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

 सन १६८० च्या ज्येष्ठ वद्य नवमीला श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून या पालखी समवेत सर्व टाळकरी आळंदीस आले, *आळंदीला श्री ज्ञानेश्वर माऊलींच्याही पादुका त्याच पालखीत ठेवून ही श्री ज्ञानेश्वर – तुकारामांची संयुक्त पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. अशाप्रकारे सन १६८० पासून सन१८३५ पर्यंत हा ज्ञानोबा तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा अखंड चालू राहिला.* मधल्या काळात सन १८१८ च्या पुढे श्री तुकाराम महाराज यांचे वंशजात वतनासंबंधी वाद सुरू झाला, हा वाद इतका विकोपाला गेला की तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री महादेव बुवा यांचे नातू श्री महादेव महाराज हे आपले लहान चिरंजीव श्री वासुदेव महाराज यांचेसह वतनाचा त्याग करून पंढरपुरास कायम वास्तव्यासाठी आले, त्यामुळे ही पालखी प्रथा चालू राहते की बंद पडते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सुदैवाने पुढे हा संयुक्त पालखी सोहळा अखंड चालूच राहिला.

अधिक वाचा  ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो : कोणाला म्हणाले अमोल कोल्हे असं?

(क्रमश:)

 -डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love