विश्वशांती,दहशतवाद मुक्तीसाठी ११ सप्टेंबर रोजी एक लाख शिवभक्त करणार वैश्विक महारुद्राभिषेक


पुणे–भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील जागतिक परिषदेत शांतता व मानवतेचा संदेश दिला. स्वामी विवेकानंदांना अभिवादन व विश्वशांतीचा प्रसार आणि दहशतवाद मुक्तीसाठी ११ सप्टेंबर २०२२ रोजी एक लाख शिवभक्तांकडून महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे. पुण्यातील रुद्राभिषेक ओंकारेश्वर मंदिरात होणार आहे, अशी माहिती संयोजक व वयम संस्थेचे संस्थापक गौरव त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र मठ मंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक, श्री ओंकारेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त धनोत्तम लोणकर, भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या कार्याध्यक्ष प्रियंका शेंडगे-शिंदे आदी उपस्थित होते. बालन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.

गौरव त्रिपाठी म्हणाले, “स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबरला विश्वाला संबोधित करताना असहिष्णुता, शोषण संपवून विश्वशांती, दहशतवादमुक्त समाज, धार्मिक आदर भावना आणि मानवतेचा संदेश दिला. खऱ्या अर्थाने ११ सप्टेंबर हा दिवस ‘विश्वशांती दिवस’ म्हणून साजरा व्हावा. त्या निमित्ताने विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचावा, या उद्देशाने देशभर एक लाख भक्तांकडून महारुद्राभिषेक केला जाणार आहे. प्रत्यक्ष व्हर्च्युअली होणार हा महारुद्राभिषेक विश्वस्तरावर विक्रमी असा असेल.”

अधिक वाचा  आपण कशामागे धावतोय याचा विचार करा

“भगवान शंकराच्या आशीर्वादाने वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात मुख्य रुद्राभिषेक, तर त्याचवेळी जगभरातील शिवमंदिरात हा विक्रमी रुद्राभिषेक होणार आहे. महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगासहित शिवमंदिरात रुद्राभिषेकाचा नाद घुमणार आहे. लाखो लोकांपर्यंत ‘भारत शांतता, एकात्मता आणि विकासावर भर देत आहे’ असा संदेश विश्वाला देण्याचा या उपक्रमातून प्रयत्न होत आहे. शिवभक्तांनी ऑनलाईन संकल्प घेत सहभागी व्हावे. www.harharmahadeva.com या संकेतस्थळावर १०८ रुपये देणगी देऊन सहभाग नोंदवता येईल. १००८ रुपये देणगी देऊन भक्तांना रुद्राभिषेकाचा घरपोच प्रसाद मिळवता येईल. नोंदणी केल्यावर शिवभक्तांना लिंक मिळेल. त्यावरून या रुद्राभिषेकात सहभागी होता येईल,” असे गौरव त्रिपाठी यांनी नमूद केले.

विश्व हिंदू परिषदेचे महासचिव स्वामी विज्ञानानंद महाराज यांच्या कल्पनेतून हा महारुद्राभिषेक साकार होत आहे. १२९ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या या शांती संदेशाचे, तसेच ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे स्मरण करण्यासाठी ११ सप्टेंबरची निवड केल्याचे मनोहर ओक म्हणाले.

अधिक वाचा  यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार जेष्ठ गायिका प्रभा अत्रे आणि डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर

११ सप्टेंबर २००१ रोजी अमरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. संपूर्ण जगासाठी, त्यातही अमेरिकेसाठी हा मोठा धक्का होता. न्यूयॉर्क सिटीत झालेल्या या हल्ल्यात हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला. या दहशतवादी हल्ल्यामुळे ‘९/११’ची ओळख हिंसा आणि तिरस्कार अशी झाली. पण त्याआधी याच ११ सप्टेंबरच्या दिवशी  स्वामी विवेकानंद यांनी अहिंसा, सहिष्णुता आणि प्रेमभाव जपण्याचा संदेश जगाला दिला होता. त्याचे स्मरण म्हणून ११ सप्टेंबर हा विश्वशांती दिवस व्हायला हवा, असेही मनोहर ओक यांनी सांगितले.

धनोत्तम लोणकर म्हणाले, “काशी विश्वनाथ मंदिरात होत असलेला हा महारुद्राभिषेक ओंकारेश्वर मंदिरातही होत आहे, याचा आनंद आहे. ओंकारेश्वर हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असून, अधिकाधिक पुणेकरांनी या महारुद्राभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे. समाजातील वाईट शक्तींना संपवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा असणार आहे. ओंकारेश्वर देवस्थांकडून ११ सप्टेंबर रोजी आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे.”

अधिक वाचा  #PIFF : महाराष्ट्र सरकार लवकरच चित्रपटाबद्दल एक धोरण आणणार- अविनाश ढाकणे

स्वामी विवेकानंद यांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा वाटा मोठा होता. जोवर आईकडून मुलाला चांगले, सौहार्दाचे संस्कार मिळणार नाहीत, तोवर समाजात शांतता, मानवता आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजणार नाही. विश्वशांतीसाठी होत असलेल्या या महारुद्राभिषेकात पुण्यातून जास्तीतजास्त शिवभक्तांचा, महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रियांका शेंडगे-शिंदे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love