पुणे-बनावट वेबसाईच्या माध्यमातून नापास मुलांना मोठी रक्कम घेऊन पास असल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाईट देखील तयार केल्याचही या तापासात उघड झालं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यानंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावी, बारावी परीक्षेत नापास विद्यार्थ्यांना बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन पास करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक असल्याचे सांगत सांगलीतील संदीप कांबळे याच्याशी संपर्क केला. त्याने १० वीच्या प्रमाणपत्रासाठी साठ हजार रुपये लागतील असे सांगितले. ग्राहकाने ३९ हजार रुपये ट्रान्सफर केले आणि उर्वरित २१ हजार रुपयांसाठी कांबळे पुण्यातील स्वारगेट या ठिकाणी आला असता पोलिसांनी त्याला सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
कांबळेकडे केलेल्या चौकशीत त्याने आणखी तिघांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, छत्रपती संभाजी नगर), अल्ताफ शेख (रा. परांडा जि. धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनाही अटक केली.चौघांकडून केलेल्या चौकशीत त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
नापास विद्यार्थ्यांना पास असल्याची बनावट प्रमाणपत्रे देण्यासाठी त्यानी अनेक ठिकाणी एजंट नेमले होते. संदीप कांबळे सारखे एजंट ज्यांना १०वी पासचे प्रमाणपत्र गरजेचे आहे,अशांशी संपर्क साधायचा. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना ही बनावट प्रमाणपत्रे दिली जात होती. एका प्रमाणपत्रासाठी ३५ ते ५० हजार रुपये घेतले जायचे. कोणतीही सरकारी कामे, नोकरी, व्यवसाय किंवा कर्जासाठी तसेच अन्य कामांसाठी दहावी पासचे प्रमाणपत्र अनिवार्य असते. पण अनेकांकडे तेही नसल्याने किंवा काहीजण दहावीत नापास झाल्याने कामांमध्ये अडथळा येतो. पण आतापर्यंत शेकडो लोकांनी इकते पैसे देऊन अशी बनावट प्रमाणपत्रे या टोळीकडून घेतली असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे.
२०१९ मध्ये ही या टोळीने महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलच्या वेबसाईट सारखी हुबेहुब वेबसाईट बनवली. तेव्हापासून ही टोळी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून १०वी, १२वीची, आयटीआय, पदवी परीक्षेची बनावट प्रमाणपत्रे देत आहे. सुरुवातीला फक्त ३५ जणांना अशी प्रमाणपत्रे दिल्याची माहिती होती. पण नंतर तपास केला असता आतापर्यंत तब्बल ७०० लोकांना अशी बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात आढळून आले आहे.