मुंबई- ठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील 5 कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार असून येत्या एक मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार असून त्याच्या नावनोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.
महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 6 हजार 500 कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या फक्त 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे.
दरम्यान, लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.