पुणे- माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय सुमंत दाढे (वय 55) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
जलतरणाला सुरवात करणाऱ्या दाढे यांनी आपली कारकीर्द घडविण्यासाठी वॉटरपोलो या जलतरण क्रीडा प्रकाराची निवड करताना 1980 ते 90 या दशकात आपला दबदबा राखताना अनेक स्पर्धा आपल्या कामगिरीने गाजवल्या. आशियायी स्पर्धेतील वॉटरपोलोचे ब्रॉंझपदकही मिळविले होते. तर अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाच्या वॉटरपोलो संघाचेही नेतृत्व केले होते.
महाराष्ट्र शासनाने 1995 मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र आणि रेल्वे या दोनही संघाकडूनही खेळताना त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती.खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर जलतरण संघटक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. खेळाडू म्हणूनजेवढी त्यांची कारकीर्द गाजली, तेवढे ते संघटक म्हणूनही यशस्वी झाले. पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेसह महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्षपद, भारतीय जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष तसेच भारतीय जलतरण महासंघाच्या वॉटरपोलो उपसमितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचेही ते अध्यक्ष होते.
जलतरण संघटक झाल्यावर त्याच्या प्रयत्नांतून अनेक मोठ्या स्पर्धा पुण्यात तसेच महाराष्ट्रातील जलतरणात झालेल्या सकारात्मक बदलात त्याचा मोठा वाटा होता. महाविद्यालयात खेळाडूंच्या प्रवेशाला प्राधान्य देणे ही त्यांची भूमिका होती. शिक्षण प्रसारक मंडळीत काम करत असताना त्यांनी आपल्या या भूमिकेवर प्रामुख्याने भर दिला होता.