पुणे-पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात ‘टेलिग्राफ अॅक्टनुसार’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जात आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबादमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर आरोप केले होते. हा अहवाल केंद्रीय गृह सचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी २७ मार्चला राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता.
दरम्यान, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शुक्ला यांनी नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दणका देत त्यांची मागणी फेटाळून लावली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणीही शुक्ला यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानेही त्यांची ही मागणीही फेटाळून लावली होती.