पुणे-“आजच्या तरुणांसाठी द्वारकादास माहेश्वरी यांचे आयुष्य एक आदर्श आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून व्यावासायाशी जोडले गेलेले, केवळ एक लाख रुपये घेऊन धुळ्याहून पुण्यात आलेले द्वारकादास यांनी मेहनत आणि शिस्त यांच्या जोरावर यशस्वी वाटचाल करत आज केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात ५० दुकाने सुरु केली आहेत. त्याचबरोबर आपला परिवार, मित्रमंडळी यांच्याशी देखील स्नेहाचे नाते कायम ठेवले. त्यामुळे जीवनातील वाटचाल कशी असावी, याचे ते उत्तम उदाहरण बनले आहेत,” असे मत अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्ट’चे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल शॉप आणि मॅजेस्टिक लँडमार्क या बांधकाम व्यवसाय कंपनीचे संस्थापक द्वारकादास माहेश्वरी यांच्या ८० व्या जन्म दिवसानिमित्त आयोजित सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमात माहेश्र्वरी यांच्या जीवन प्रवासावर प्रवास टाकणाऱ्या ‘भाऊ’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. २ ऑक्टोबर ) सेनापती बापट रस्ता येथील जे डब्ल्यू मेरीएट हॉटेल याठिकाणी स्वामीजींच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी द्वारकादास यांच्या पत्नी निर्मला माहेश्वरी, मुलगा श्यामकुमार माहेश्वरी आणि मॅजेस्टिक लँडमार्क’ चे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी, उद्योजक जयंत शाह, प्रकाश धारिवाल, शेखर मुंदडा, दीपक मानकर, विजयकांतजी कोठारी आणि विशाल चोरडीया हे उपस्थित होते. कार्यक्रमात स्वामीजींच्या हस्ते द्वारकादास यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात मान्य हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर पुणे आर्टिस्ट’च्या कलाकारांनी भरतनाट्यम् नृत्य सादर केले.
यावेळी आपल्या आशीर्वचनाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणाले, “ समाजात धन वाढले, सुविधांमध्ये वृद्धी झाली पण संस्काराची कमतरता निर्माण झाली आहे. तरुणाई मध्ये चांगल्या संस्काराचा अभाव दिसून येत आहे. त्यांना प्रेरणा मिळेल अशी उदाहरणे निर्माण करणे गरजेचे आहे. केवळ शास्त्रांचे दाखले देऊन, गोष्टी सांगून हे शक्य होणार नाही. तर भाऊ यांच्या सारख्या लोकांचे जीवन त्यांच्यासमोर आणले पाहिजे.”
प्रत्येकाने जीवनात महान बनण्याचे स्वप्न पहावे, आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे. स्वत: महान बनावे, आपल्या परिवाराला, समाजाला आणि आपल्या राष्ट्राला महान बनवावे, यातच आयुष्याचे सार्थक आहे. राष्ट्राला मजबूत बनविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळेच, प्रत्येक नागरिकाने स्वतः समर्थ बनले पाहिजे,’’ असेही स्वामीजींनी सांगितले.
स्वामीजी पुढे म्हणाले, “ आजच्या शिक्षण पद्धतीत पैसे कसे कमवावे हे तर शिकविले जाते, पण ते कसे खर्च करावे हे शिकविले जाते की नाही, हा प्रश्न आहे. – धन अशा ठिकाणी खर्च करावे, जिथे ते सार्थकी लागेल. त्यामुळेच ज्यांनी करोनासारख्या आपत्तीच्या काळात, एखाद्याची मदत करण्याच्या हेतूने, एखाद्याच्या आयुष्याचे उत्थान करण्यासाठी धन खर्च केले ते सार्थकी लागले आहे.’’
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमन यांनी केले, तर उर्वशी माहेश्वरी यांनी आभार मानले.