एसटी बसमध्ये झोपण्यास जागा देऊन चालकाचा महिलेवर बलात्कार


पुणे–कामासाठी पुण्यात आल्यानंतर, भाड्याची खोली मिळाली नाही म्हणून एसटी स्टँडवर झोपण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला बस चालकाने एसटी बसमध्ये झोपण्यास जागा दिली. पती लघुशंकेसाठी गेला असताना, बस दुसऱ्या ठिकाणी नेऊन, चालकाने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार स्वारगेट एसटी स्टँड मध्ये घडल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी काही तासात या बसचालकाला अटक केली. नवनाथ शिवाजी भोंग (३८, रा. मु. पो. वडापुरी, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे राहणार्‍या २१ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०९/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे पुण्यात आले होते. ते राहण्यासाठी खोली शोधत होते. स्वारगेट एसटी बसस्थानकाजवळून शनिवारी रात्री साडेअकरा वाजता जात होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या नवनाथ भोंग याने त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी खोली शोधत असून आता स्टँडवर झोपायला जात असल्याचे सांगितले. त्याने माझ्या गाडीत झोपा असे सांगून त्यांना गाडीत झोपायला जागा दिली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या पतीला लघुशंका लागली. तेव्हा त्याने पतीला स्वारगेट बस स्टँडवरील स्वच्छतागृहात नेले. तो आत गेल्यावर भोंग हा तेथून पळून गाडीत आला. त्याने बस स्टॉर्ट करुन लांबवर नेले. एका बाजूला बस उभी करुन त्याने महिलेवर एका पाठोपाठ दोन वेळा बलात्कार केला.

अधिक वाचा  राजकारणात 'इंटेलिजेंस कोशियंट'पेक्षा भावनिक गुणधर्म महत्वाचे

त्यानंतर त्याने या महिलेला बसमधून ढकलून देऊन तो बस घेऊन निघून गेला. दरम्यान, फिर्यादीचा पती तेथे आल्यावर बस दिसली नाही, म्हणून त्याने शोधाशोध सुरु केली. तेव्हा काही वेळाने त्याला आपली पत्नी दिसून आली. तिने भोंग याने केलेल्या कुकर्माची माहिती पतीला दिली. ते पहाटे ५ वाजता स्वारगेट पोलीस ठाण्यात आले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली.

काँबिंग ऑपरेशन संपवून सर्व जण नुकतेच घरी गेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी तातडीने दोन पथके तयार करुन शोध सुरु केला. तेव्हा सीसीटीव्हीमध्ये बसचा ६६ इतकाच नंबर दिसला. पोलीस पथकांनी सर्वत्र बसचा शोध सुरु केला.

तेव्हा सातारा रोडवरुन ही संशयित बस एका पथकाला दिसली. त्यांनी हात दाखवून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने बस थांबविली नाही. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. बिबवेवाडी येथे बस थांबली. बसचालक बस सोडून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love