पंतप्रधान मोदी उद्या देहू दौऱ्यावर : मोदींच्या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून वाद

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवार) देहू दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, देवस्थान संस्थेतर्फे मोदींच्या स्वागतासाठी डिझायनर पगड्या तयार करण्यात आल्या असून या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून आता वाद निर्माण झाला होता मात्र, त्या ओवीत बदल केल्यानंतर हा वाद शमला आहे. याआधी देखील पुण्यात मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून देण्यात आलेल्या फेट्यावरील शिवमुद्रेवरून वाद निर्माण झाला होता.

नरेंद्र मोदी हे उद्या संत तुकाराम महाराज यांच्या देहूत दाखल होत आहेत. यानिमित्त ही भेट विशेष बनविण्यासाठी देवस्थान संस्थेतर्फे मोदींसाठी डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्यात आले आहे. देहू संस्थांन विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्या कला वर्कशॉपमध्ये या पगड्या तयार केल्या जात आहे. या पगड्यांवर पारंपरिक पद्धतीने हस्तलिखित ओवी कारागिरांनी लिहिली असून या माध्यमातून संपूर्ण जगात तुकोबांचे विचार पोहचवण्याचा मानस असल्याची माहिती दिली जात आहे. परंतु, नेमक्या याच ओवीवरून आता वाद निर्माण झाला आहे.

सुरुवातीला या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या ओळी होत्या. परंतु, यावर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर आता देहू संस्थानाने ओवी बदलल्या आहेत. आता या पगडीवर ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशा ओळी टाकण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा दौरा याआधीही अनेक वेळा वादात आला आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त संत तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

देहुला पोलीस छावणीचे स्वरूप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून देहुला छावणीचे स्वरूप आले आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी १० पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ३०० पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण २ हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.

मंगळवारी  सकाळी ८ वाजल्यापासून जुना मुंबई महामार्गावरून देहूत केवळ व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. इतर वाहनांना प्रवेश नाही. सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *