पुणे–पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या पुण्याचा शार्प शूटर संतोष जाधव याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. संतोष याला पुणे पोलिसांनी आज उशीरा गुजरात येथून अटक केली असून यापूर्वी त्याचाचसाथीदार सिद्धार्शकां कांबळे (सौरभ महाकाल) याला पुण्यातील नारायणगाव येथून अटक करण्यात आली आहे.
संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी यांना काल रात्री गुजरातमधून अटक करण्यात आल्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत के. सारंगल ( कायदा व सुव्यवस्था ) यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांनी लॅारेन्स बिश्नोई गँगशी संबंधाची कबुली दिली आहे. तर नवनाथ सुर्यवंशीची संतोष जाधवला आसरा दिल्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचेही कुलवंत सारंगल यांनी सांगितले.
दरम्यान, सौरभ महाकाळची चौकशी सुरू असताना नवनाथ सुर्यवंशी याने संतोष जाधवला गुजरात येथील भूज येथे आसरा दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून गुजरात येथून संतोष जाधव याला रविवारी (१२ जून) ताब्यात घेण्यात आले. यावेळी संतोष जाधवने टक्कल केल्याचं आढळून आलं. ओळख लपवून ठेवण्यासाठी त्याने टक्कल केल्याचे आरोपी संतोष याने सांगितले.
दोघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी त्यांचे संबंध आणि पंजाबी गायक सिद्दू मुसेवाला यांच्या हत्येसह पुढील तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
सिद्धू मुसेवाला यांच्यावर आठ जणांनी हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. त्यातील दोघे हे पुण्यातील असल्याचे निदर्शनास आल्यानेपुणे पोलिसांनी तात्काळ शोधमोहिम सुरू केली होती. काही दिवसांतच नारायणगाव येथून सिद्धार्श कांबळे याला पोलिसांनी अटककेली आणि त्याच्या चौकशीअंती तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
कित्येक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रडारवर असणारा आणि सिद्धू मुसेवाला हत्येतील शार्प शूटर संतोष जाधव याला पुणे पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आणि रात्री उशीरा न्यायालयात दाखल केले. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणी अधिक तपासासाठी २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे संतोष जाधव?
संतोष जाधव हा आंबेगाव येथील पोखरी गावचा रहिवासी आहे. संतोष जाधव याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले याच्या खूनप्रकरणी मोक्का कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी काही महिन्यांपासून पुणे ग्रामिण पोलिस त्याच्या मागावरच होते. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आला होता आणि यामध्ये संतोष जाधव याचे नाव समोर आले होते. यापूर्वी त्याच्यावर चोरीचा गुन्हासुद्धा दाखल होता. दरम्यान, मोक्का लावल्यानंतर पुणे ग्रामिण पोलिस अनेक दिवस संतोष जाधव या्च्या मागावर होते. त्यासाठी त्याचागुजरात, राजस्थान या ठिकाणी शोध घेतला जात असताना बिष्णोई टोळीत सहभागी झाल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. परंतु मुसेवाला हत्याप्रकरणानंतर संतोष जाधवला अटक करण्यासाठी वेगाने चक्रे फिरू लागली. अखेर पुणे पोलिसांना गुजरात येथून संतोषजाधव याच्या मुसक्या आवळण्यास यश आले.