पुणे- जेनेरीक औषधे स्वस्त असतात आणि त्यामुळे खूप बचत होते असे सांगत जेथे ठराविक औषधांची गरज असते, असे दुर्धर आजार वगळता डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
जनौषधी दिवसानिमित्त, जावडेकर यांनी पुणे येथील कोथरूड डी. पी रोड स्थित सखाई प्लाझा हेल्थ पॉईंट क्लिनिकमधील जनौषधी केंद्राला भेट दिली आणि पंतप्रधानांनी जन औषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी केलेला संवाद लाइव्ह ऐकला. त्यांनी सांगितले की, रुग्णांना केवळ जेनेरिक औषधेच लिहून द्यावीत असे आवाहन, डॉक्टरांना पत्र लिहून आणि त्यांना भेटून आपण करणार आहोत. जेथे ठराविक औषधांची गरज असते, असे दुर्धर आजार वगळता डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत, ही औषधे स्वस्त असतात आणि त्यामुळे खूप बचत होते.
यानिमित्ताने बोलताना जावडेकर म्हणाले की, 50 कोटी भारतीयांना 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच देणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना पंतप्रधांनी सुरु केली. या जनौषधी केंद्रांमध्ये औषधांची किंमत बाजारभावाच्या तुलनेत 60-70 टक्के कमी असते. 500 पेक्षा जास्त औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. हृदयात स्टेण्ट टाकण्याची तसेच गुडघे प्रत्यारोपण यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत अतिशय कमी खर्चात होतात . या योजनेमुळे औषधांची किंमत इतकी कमी झाली आहे की, लोक या केंद्रांना मोदींचे स्वस्त औषधांचे दुकान म्हणतात. केवळ 100 जनौषधी केंद्रांपासून सुरु झालेल्या या योजनेअंतर्गत आता 7500 केंद्रे आहेत. नागरिकांचे उत्पन्न न पाहता विनामूल्य आरोग्य सेवा देणारे जम्मू आणि काश्मीर हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यांनी सांगितले की, देशभरात 50,000 आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आता योग आणि व्यायाम प्रशिक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच यांसारखी 1.5 लाख केंद्रे सुरु होणार आहेत.