पुणे(प्रतिनिधि) – होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥
टाळ-मृदंगाचा गजर, विणेचा झंकार, आणि जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष अशा भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी (दि. २८) दुपारी साडेतीन वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा ३३९ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या (शनिवारी) ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.
देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर शनिवारी रात्री तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
संत तुकाराम महाराजांचा हा ३३९ वा पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती. या सोहळयासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. मानाचा वारकरी आणि पाहुण्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करून पादुका पालखीत विराजमान झाल्या. पालखीने जसे प्रस्थान ठेवले तसे टाळ-मृदंगाचा आवाज टीपेला पोहोचला. वारक-यांचा उत्साह दुणावला. वारकरी विठ्ठलनामासोबत डोलू लागले, नाचू लागले. इंद्रायणीच्या लाटांनीही या सुरात आपले सूर मिसळले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. काहींना तुकाबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. त्यांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोबाचरणी आपली सेवा रुजू केली. हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली.
देहूतील मंदिराच्या मंडपात दुपारी दोन वाजता पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात तुकाबांचा चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. दुपारी साडेतीनच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. नगराध्यक्षा पूजा दिवटे, तहसीलदार जयराज देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यावेळी उपस्थित होते.
असा पार पडला सोहळा
पहाटे साडे चार वाजता देऊळवाड्यात काकडा झाला. त्यांनतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शिळा मंदिरात महापूजा पार पडली. तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा करण्यात आली . सकाळी १० ते १२ या कालावधीत देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी अकरा वाजता इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात सन्मानपूर्वक आणण्यात आल्या. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. सुमारे दीड तास हा कार्यक्रम पार पडला. साडेचार नंतर पालखी प्रदक्षिणा करण्यासाठी सज्ज झाली. दोन तासांच्या पालखी प्रदक्षिणेनंतर तुकोबांची पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ झाली. आज रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल.
देहू संस्थानकडून सेवा रुजू
देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. विठ्ठल-रूक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.