पिंपरी(प्रतिनिधी)–राज्यातील विविध महामार्गांवर उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांपैकी काही टोलनाके मुदत संपल्यानंतर बंद करण्यात आले आहेत. मात्र, या बंद करण्यात आलेल्या टोलनाक्यांचे सांगाडे तसेच पडून आहेत. त्यामुळे ही ठिकाणे वाहनचालकांसाठी अडथळे ठरत आहेतच; शिवाय हे बंद टोलनाके गुन्हेगारी केंद्रे बनत चालली आहेत. त्यामुळे बंद टोलनाक्यांचे सांगाडे हटवा, अन्यथा हे सांगाडे छावा स्टाईलने हटवू, असा इशारा छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे.
रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की गेल्या चार पाच वर्षात राज्यातील अनेक महामार्गावरील टोलनाके बंद करण्यात आले आहेत. परंतु हे टोलनाके बंद करूनही सांगाडे अद्याप काढून टाकण्यात आले नाहीत. टोल कलेक्शन बूथही वाहनचालकांना अडथळे ठरत आहेत. एवढेच नाही तर हे बूथ गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वाहनचालकांना त्रास देण्याचे काम करीत आहेत. वाहनचालकांची अनेकदा लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बहुतांश बंद टोलनाके जुगाराचे अड्डे बनत चालले आहेत. त्यातून अनेकदा मोठमोठे वाद निर्माण होत आहेत.
याबरोबरच बंद टोलनाक्यांचे सांगाड्यांचे विविध पार्ट अचानक तुटून पडत असल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या सांगाड्यांचा पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गतिरोधकही जैसे थे असल्यामुळे वाहनांचा वेग कमी होत आहे. अचानक वेग कमी झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जुगार खेळणाऱ्या लोकांबरोबरच भटक्या कुत्र्यांचे हे हक्काचे घर बनले आहे. अनेकदा या कुत्र्यांचा वाहनांखाली येऊन जीवही गेलेला आहे. त्यामुळे राज्यभरातील बंद टोलनाक्यांचे सांगाडे तात्काळ हटवून रस्ते मोकळे करण्यात यावेत. अन्यथा छावा मराठा संघटनेच्या माध्यमातून या सांगाड्यांचा जाहीर लिलाव करू, असा इशाराही रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.