पुणे : कोथरूडच्या प्रथम डॉक्टर श्रीमती मंगलाबाई कृष्णाजी पटवर्धन (वय ९१) यांचे आज वृद्धापकाळाने दुपारी निधन झाले. अंत्यविधी आजच संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले.
सन १९५४ पासून त्या कोथरूड, कर्वेनगर, वडगाव, खडकवासला येथील सर्वसामान्य नागरिकांची वैद्यकीय सेवा कोणतीही वाहतूक व्यवस्था नसताना देखील करीत होत्या. कोथरूड मधील त्या पहिल्या एमबीबीएस डॉक्टर होत्या. कोणतेही उत्पन्न न घेता त्या व्रत म्हणून हे काम करीत होत्या. हजारो नागरिकांच्या त्या फॅमिली डॉक्टर होत्या. महिलांसाठी विशेष काम त्या करीत असत.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनिक कै. किशाभाऊ पटवर्धन यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, डॉ. महिपाल पटवर्धन, डॉ. वासंती पटवर्धन व डॉ. अवंती पटवर्धन ही मुले व नातवंडे असा परिवार आहे.