पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये खाट मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. ससून रुग्णालयात एका खाटेवर दोन रुग्ण तर काही रुग्ण जमिनीवर झोपून उपचार घेत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची दमझाक होते आहे. दरम्यान, खाट उपलब्ध न झाल्याने पुण्यातील वारजे- माळवाडी भागातील एका 41 वर्षीय कोरोनाबाधित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे पुण्याती आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजले आहेत याचे वास्तव या घटनेने समोर आले आहे.
या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु सर्वतोपरी प्रयत्न करूनही बेड उपलब्ध झाला नाही. अशा वेळी शारीरिक आणि मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या महिलेने थेट आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. या हृदयद्रावक घटनेने वारजे माळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिलला दुपारी साडेचारच्या सुमारास महिलेची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने कोरोना चाचणी केली. महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. एकही बेड उपलब्ध नसल्याने शेवटी पती – पत्नी दोघेही घरी आले. त्यादिवशी रात्री पतीने जेवण बनवले. तिला काही औषधे दिली. महिला आतल्या खोलीत एकटी झोपली होती. सकाळी पती तिला उठवायला गेल्यावर बेडरूमच्या पंख्याला दुपट्टा लावून गळफास घेतल्याचे पतीला दिसले. तसेच सोबत चिट्ठीही लिहून ठेवली होती. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.