पुणे- कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचे दुष्परिणाम आता वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यकता भासते हे लक्षात घेऊन रा. स्व. संघ जनकल्याण समिती, स्पार्क संस्था आणि समर्थ भारत यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ या संदर्भात ‘माहिती आणि सहाय्यता केंद्र’ सुरू केले आहे.( corona War Room ) डेक्कन येथील सावरकर स्मारक येथे सकाळी ९ ते रात्री ९ हे मदतकेंद्र सुरु असणार आहे. अशी माहिती रा.स्व. संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली.
सेवा सर्वोपरी या न्यायाने रुग्णांना वेळेवर मदत, उपचार, नातेवाइकांची धावपळ कमी व्हावी या उद्देशाने हे सहाय्यता केंद्र सुरु झाले आहे. केंद्राद्वारे नागरिकांना आवश्यक ती माहिती आणि उपयोगी संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्वरित मदत मिळू शकेल.
या केंद्राच्या माध्यमातून ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, कोविड केअर सेंटर मधील उपलब्ध असलेल्या जागांची माहिती 7769003300, 7769004400 या संपर्क क्रमांकावर मिळेल.
इतर आवश्यक असणाऱ्या सेवा त्यात ॲम्ब्युलन्स, व्हॅक्सिनेशन सेंटर, टेस्टिंग सेंटर, लॅब, डायग्नोस्टिक लॅब, ब्लड बँक, विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर्स, समुपदेशक, रुग्णोपयोगी साहित्य केंद्र याबरोबरच अगदी जेवणाचे डबे या संदर्भातील महिती 9359693045 या संपर्क क्रमांकावर मिळेल.
लसीकरण संदर्भातील असलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देणे, घराजवळील लसीकरण केंद्राचा पत्ता देणे. टेस्टींग करण्यासाठी विविध लॅब्सची माहिती, त्याचबरोबर इतर आजारांवर मार्गदर्शन करणारे विविध पॅथीचे डॉक्टर्स, रक्तदानाविषयी जागृती, कोविड पॉझिटिव्ह आणि पोस्ट कोविड रुग्णांसाठी समुपदेशकांचेही संपर्क क्रमांक दिले जात आहेत.
या विषयासाठी ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करायचे असेल त्यांनाही संधी दिली जाणार आहे. तसेच या विषयांसाठी वस्तुरूप आणि आर्थिक निधीच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्यांनाही योग्य ते मार्गदर्शन दिले जाणार आहे.
समर्थ भारत आणि स्पार्क च्या कार्यालयातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून हे केंद्र सावरकर स्मारक, डेक्कन येथे सकाळी ९ ते रात्री ९ चालवले जात आहे.