पुणे– केंद्र सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत नव्याने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर युवकांमध्ये असंतोषाचे वातारण आहे. कोविडमुळे अगोदरच सैन्यदल भरती प्रक्रिया खोळंबल्याने तरुणांची निराशा झाली. त्यात आता अग्नीपथ योजनेमुळे लष्करात सेवा देऊ इच्छिणार्या तरुणांची निराशा झालि असून. ही योजना त्वरित मागे घेण्यासाठी आज काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात आंदोलन केले.
हे आंदोलन पुण्यात काँग्रेसने पंचशील चौक ताडीवाला रोड येथे केले. हे आंदोलन काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनाला काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, संगीता तिवारी, पुणे शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, काँग्रेसचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संग्राम थोपटे म्हणाले, केंद्रसरकारने आणलेली ‘अग्निपथ’ योजना ही चार वर्षांची सेवा करून तरुणांना पुन्हा वाऱ्यावर सोडून देणारी आहे. चार वर्ष लष्करी सेवेत कर्तव्य बजावलेल्या जवानांना ऐन उमेदीच्या काळात उघड्यावर सोडून देणे हा त्यांचा अपमान करणारे आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर या अग्निविरांना भाजपा कार्यालयात चौकीदाराची नोकरी देऊ असे विधान भाजपाचे नेते करत आहेत यातूनच भाजपाचे जवानांबद्दलचे बेगडी प्रेम दिसून देते. देशसेवा करणाऱ्या जवानांचा अपमान आम्ही कदापी खपवुन घेणार नाही. सैन्यदलात केवळ चार वर्षांची सेवा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेली तडजोड असून हा देशद्रोहच आहे. तरुणांच्या भवितव्याशी केंद्र सरकारने खेळ चालवलेला असून याबद्दल भाजपा सरकारने देशाची माफी मागावी. अग्निपथच्या नावाखाली कंत्राटी लष्कर भरती करण्याला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी आमची मागणी आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत. असे संग्राम थोपटे म्हणाले.