भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण


पुणे–49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून येथील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे  विजय दिवसानिमित्त विशेष समारंभ 16  डिसेंबर 2020 रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.

49 वर्षांपूर्वीच्या युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या युद्धातील भव्य विजयाचा परिणाम म्हणून पाकीस्तानचे विभाजन होऊन, बांगलादेशाची निर्मिती करण्यात आली. त्यासोबतच, या विजयामुळे भारत आशियाई प्रदेशात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला. भारताच्या पारंपरिक शत्रूसोबत झालेल्या या निर्णायक विजयानंतर भारताची सैन्यदले देशाची एक भक्कम शक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

1971 साली, 3 डिसेंबर रोजी, पाकिस्तानने भारताच्या 11 हवाई तळांवर हल्ला केला आणि या तिथून या युद्धाला तोंड फुटले. पाकिस्तानचे तेव्हाचे लष्करशहा जनरल ह्यायाखान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकीस्तान मध्ये केलेल्या नृशंस हत्याकांडांमुळे आणि अनन्वित अत्याचारांमुळे ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. हे अल्पकाळ चाललेले मात्र अत्यंत भीषण स्वरूपाचे  युद्ध भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांवर लढले गेले. 13 दिवसांच्या या युद्धानंतर, पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे शरण आले आणि त्यानंतर पूर्व पाकिस्तान बांगलादेश बनला.

अधिक वाचा  मंगळवारपासून भरणार 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा आखाडा : 'महाराष्ट्र केसरी'ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस

या युद्धात, भारतीय सैन्य, पाकिस्तानी लष्करावर सर्व दृष्टीनी वरचढ ठरले.युद्धादरम्यान, दक्षिण कमांडच्या सैन्याने अत्यंत शौर्य गाजवत पाकिस्तानपासून देशाच्या सीमांचे रक्षण केले. या युद्धादरम्यान दक्षिण कमांड क्षेत्रात  गाजलेल्या लढाया म्हणजे लोंगेवाला आणि प्ररबत अलीची लढाई होत, ज्यात पाकिस्तानी सैन्याचा भारतीय जवानांनी धुव्वा उडवला होता. जोधपूर स्टेटचे राजे, लेफ्टनंट कर्नल भवानी सिंग (नंतर ब्रिगेडियर),  यांच्या नेतृत्वाखाली 10 पैरा कमांडो बटालियनने पाकिस्तानामधल्या छाछरो  गावात घुसून फडकावलेला तिरंगा ही या युद्धातली आणखी एक चित्तथरारक आणि गाजलेली लढाई होती. या लढायांमध्ये भारतीय सैन्याचे शौर्य,दृढनिश्चय आणि पराक्रम याचे सर्वांना दर्शन झाले.

या विजय दिवसानिमित्त आज या युद्धात प्रचंड शौर्य गाजवत सर्वोच्च बलिदान देणारे सैनिक, हवाई अधिकारी आणि नौसैनिकांचे स्मरण करत त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाप्रती आपल्या कर्तव्याचे निर्वहन करतांना वीरमरण पत्करणाऱ्या सैनिकांना यावेळी सलाम करण्यात आला. दक्षिण कमांड मुख्यालयातील लष्करी अधिकारी  आणि जवान या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याशिवाय 71 च्या युद्धात सहभागी झालेले ज्येष्ठ माजी सैनिक आणि अधिकारीही आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात  भारत पाक युद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली. दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ  लेफ्टनंट जनरल डी एस आहुजा, यांनी सर्वांच्या वतीने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

अधिक वाचा  ऑनलाइन सेक्सट्रॉर्शनचे राजस्थान कनेक्शन : एकाच गावातील २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये

त्यानंतर, कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांबरोबर उपस्थितांनी संवाद साधला  आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love