पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केल्यामुळे पुन्हा संतापले आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ असं उल्लेखण्यावरून यापूर्वी मोठा वादंग झाला होता. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष असलेले जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हटलं तर काय बिघडलं मग आम्ही ‘उठा’(उद्धव ठाकरे), जपा(जयंत पाटील), शपा(शरद पवार) म्हटले तर चालेल का? असा सवाल केला होता. तसेच आरोप-प्रत्यारोप आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा याबाबत सर्वच पक्षांनी एक दिवस एका बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे असे मतही पाटील यांनी व्यक्त केले होते.
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचे एकमेकांच्या कुरघोड्या करणे सुरु आहे. अजित पवार यांनी जाहीर सभेत पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टीकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले होते.
त्यावरून चंद्रकांत पाटील संतापले असून त्यांनी अजित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा दिला आहे. खूप दिवस मला ‘चंपा’ म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं, असेही त्यांनी म्हटलं आहे.