संचारबंदी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा व्यापारी महासंघाचा इशारा


पुणे- –पुण्यातील व्यापारी महासंघाने आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीला विरोध दर्शवला असून या संचारबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरचे स्टॉल सुरू राहणार, रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार, मग हा कसला लॉकडाऊन, असे म्हणत पुणे व्यापारी महासंघाने आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांनी  सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले आहेत. राज्यात संचारबंदी असेल तर मग शिवथाळी आणि रिक्षा सुरु ठेवण्याला परवानगी कशी काय देऊ शकता, असा सवाल व्यापारी महासंघाने विचारला आहे.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, राज्य सरकारने  संचारबंदीचा जारी केलेला आदेश गोंधळात टाकणारा आहे. यावरून राज्य सरकार आणि प्रशासन संपूर्ण गोंधळ असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा अशी व्यापाऱ्यांची मागणी होती. पण, संचारबंदीच्या नावाखाली सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. हा निर्णय घेताना व्यापाऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत देण्यात आली नाही.

अधिक वाचा  राज्यात पुन्हा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन : मुख्यमंत्री करणार उद्या घोषणा

संचारबंदीतीत रिक्षा, सार्वजनिक वाहतूक, खाद्यपदार्थांचे स्टॉल, शिवभोजन थाळी यांना सुरू ठेवण्याची परवानगी देता. हे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होईल. मग अशा परिस्थितीत संचारबंदीच्या नियमांचे पालन कसे होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग कसा रोखला जाईल, असा सवालही रांका यांनी उपस्थित केला.राज्य सरकारच्या या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध आहे. राज्य सरकारने काढलेला हा देश पूर्णपणे गोंधळात टाकणारा आहे. यातून काय चालू आहे आणि काय बंद आहे हेच कळत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात कायदे तज्ञांचा सल्ला घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार सुरू असून  यावर पुणे व्यापारी महासंघाची आज (दि. 14 एप्रिल) संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करू, असेही रांका म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love