पद्मशाली समाजाचा पारंपारिक महर्षी मार्कंडेय महामुनींचा भव्य रथोत्सव संपन्न


पुणे(अरुण अमृतवाड) – नारळी पौर्णिमेच्या दिवशी पद्मशाली समाजाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा  पारंपारिक महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव यंदाही नारळी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील भवानी पेठ व गंज पेठ येथून पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची भव्य रथयात्रा काढण्यात आली. पद्मशाली समाज या रथ यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नूलू पुन्नम अर्थात नारळी पौर्णिमेला पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. यंदा शतक महोत्सवी वर्ष असल्याने समाजबांधवामध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह होता. नारळी पौर्णिमा निमित्त आज मार्कंडेय मंदिरात समाजबांधवांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे पद्मशाली समाज आहे त्याठिकाणी महर्षी मार्कंडेय महामुनींची भव्य रथयात्रा काढण्यात येते. या रथयात्रेत पद्मशाली समाज मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषा करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित सहभागी होत असतो.

अधिक वाचा  पुणे फेस्टिव्हलमध्ये महिलांचा नारदीय कीर्तन महोत्सव संपन्न

पुणे, सोलापूर, अहमदनगर, मुंबई, संगमनेर, परळी अशा विविध ठिकाणी या दिवशी सकाळी शास्त्रोक्त पद्धतीने महर्षी मार्कंडेय महामुनींची पूजा करण्यात येते.  मिरवणुकीमध्ये नेत्र दीपक असे देखावे सादर केले जातात.  पुण्यातही भवानी पेठ व गंज पेठ येथून भव्य अशा श्री मार्कंडेय यांची रथयात्रा निघाली.  अतिशय शांततेच्या वातावरणात सर्व पद्मशाली उत्साही बांधवांनी या रथोत्सवात सहभागी होऊन उत्सव साजरा केला.

या रथोत्सवाचे आमदार रवींद्र धंगेकर, वनराज भाऊ आंदेकर यांनी स्वागत केले. तसेच या रथ उत्सवाचे मिरवणूक मार्गावर आजी माजी नगरसेवक, सामाजिक संघटना यांच्यावतीने स्वागत करण्यात आले उत्सवातील आयोजकांचे यथोचित सत्कार यावेळी करण्यात आले. या रथोत्सवात भवानी पेठेतील महर्षी मार्कंडेय यांचा रथ सहभागी झाला होता.  त्याचप्रमाणे गंज पेठेतील मिरवणुकीत वारकरी दिंडी, निरनिराळे वाद्य पथकं सहभागी झाली होती.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love