मुंबई- कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे. दरम्यान, एनसीबीला संशयित पदार्थ (गांजा) सापडला असून भारती आणि तिचा नवरा दोघांनाही एनसीबीने अमली पदार्थांच्या गैरवापराबद्दल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा विभागांसह तीन वेगवेगळ्या ठिकाणी एनसीबीने छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने पकडलेल्या ड्रग पेडलरच्या स्पॉटलाइटवरून भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. छापा दरम्यान एनसीबीला संशयित पदार्थ (गांजा) सापडला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर ‘ड्रग्ज अँगल’ समोर आल्यापासून एनसीबी सतत छापा टाकत आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीकडून बॉलिवूड स्टार्सवर अधिक करडी नजर ठेवली जात आहे.
ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपाल याची शुक्रवारी एनसीबी कार्यालयात काही तास चौकशी केली गेली. त्या अगोदर अर्जुनची लिव्ह-इन पार्टनर गेब्रिएला डीमेट्रिएड्सची दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला कोर्टात हजर करण्यात आले, तेथून बार्टेलला 25 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ शोधण्यास सुरूवात करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचा (एनसीबी) तपास आता दुसर्या दिशेने वाटचाल करत आहे. एनसीबी आता केवळ सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करत बॉलिवूडमधील कथित ड्रग रॅकेटचे मूळ शोधून काढत आहे. आता ही मुळे किती पसरली आहेत आणि त्यामागे कोणत्या ‘प्रभावशाली’ गोष्टी कार्यरत आहेत, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.