पुणे–बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित ‘एनडीए’ आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीमधील खरे हिरो ‘आरजेडी’चे नेते तेजस्वी यादव हेच असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. भाजपाचे मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण बिहारच्या निवडणुकीवरून अधोरेखित झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘एनडीए आघाडी’ला जनतेने कौल दिला आहे. निवडणुकीत ‘एनडीए’ने बहुमताचा आकडा पार केला, तर ‘आरजेडी’ आणि काँग्रेस आघाडीला बहुमत गाठता न आल्याने सत्तांतर घडवण्यात अपयश आले आहे. याच दरम्यान रोहित पवार यांनी ट्विट करीत बिहार निवडणुकीवर भाष्य केले आहे.
बिहारमध्ये काटय़ाची टक्कर असली, तरी बलाढय़ शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवकांनीही खंबीर साथ दिली. ही लढाई अजून संपलेली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय, याचे उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळाले. यातून बोध घेऊन नितीश कुमार हे त्यांच्यासोबत झालेला घात पचवतात, की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावे लागेल, असेही पवार यांनी म्हटले आहे.