तुमची तनु ती अमुची तनु पाहे….

लेख
Spread the love

आज श्रीराम नवमी अर्थात प्रभू श्री रामचंद्रांचा अवतरण दिन, त्याचप्रमाणे त्यांच्या अनन्य भक्ताचाही आज जन्म दिवस आहे. आजच्याच दिवशी शके १५३०ला अगदी रामजन्मकाळाच्याच वेळी जांब या गावी श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. आपल्या उपास्य देवेतेशी अगदी जन्मकाळापासून अनन्यता दर्शवणारी ही अलौकिक घटना आहे. त्यामुळेच सर्व समर्थभक्त, समर्थप्रेमी आजचा दिवस हा रामजन्मोत्सवाबरोबरच श्री समर्थजन्मोत्सव म्हणून देखील साजरा करतात. (माघ महिन्यात येणारी नवमी म्हणजेच श्री दासनवमी हाच श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म दिवस असतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. वास्तवात, चैत्र शुद्ध नवमी तथा श्रीरामनवमी शके १५३० या दिवशी श्रीसमर्थांचा जन्म झाला आणि माघ वद्य नवमी शके १६०३ या दिवशी श्री सज्जनगड येथे त्यांनी देह ठेवला.) 

आपल्या उपास्य देवतेच्या अथवा संतांच्या अवतरण दिनी त्या देवतेची वा त्या संतांची मूर्त पाळण्यात घालणे, पुष्पवर्षाव करून जन्मकाळ साजरा करणे इत्यादी परंपरा आपण आजही पाळतो. परंतु या परंपरा केवळ कर्मकांड होऊन जायला नकोत. संतांचे जन्मोत्सव साजरे करणे म्हणजे त्यांच्या कार्याचे आपण पायिक आहोत आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपल्याला आचरण करायचे आहे याचे स्मरण ठेवणे होय. त्यामुळेच आज श्री राम नवमी आणि श्री समर्थांच्या जयंती दिनी त्यांच्या उपदेशाचे स्मरण आणि चिंतन करून त्यांचा जन्मोत्सव साजरा करू या!

“तुम्हास जगोद्धार करणे आहे I तुमची तनु ती अमुची तनु पाहे”

श्री समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यातील एक अद्भुत प्रसंग त्यांचे आणि श्री रामरायाचे अद्वैत दर्शवणारा  आणि श्री समर्थांच्या कार्याची प्रेरणा, नक्की काय होती हे सांगणारा आहे. ‘तपाचरण पूर्ण झाल्यावर श्री समर्थ तीर्थाटनासाठी भारत भ्रमण करत असता हिमालयातील एका अत्यंत रमणीय आणि पवित्र कुंडाजळव येऊन पोहोचले आणि तिथे त्यांच्या मनात प्रखर वैराग्य निर्माण होऊन त्यांना जलसमाधी घेण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे श्री त्यांनी आपला देह त्या कुंडात झोकूनही दिला परंतु साक्षात श्रीरामांनी त्यांना वरचेवर झेलून, “तुम्हास जगोद्धार करणे आहे I तुमची तनु ती अमुची तनु पाहे” अशी आज्ञा केली. अर्थात, “तुम्हाला आत्ताच समाधी घेता येणार नाही, तुम्हाला जगदोद्धार करायचा आहे. तुमचा देह हा साक्षात माझाच देह आहे. तुम्हाला धर्मसंस्थापना करायची आहे” असा उपदेश श्री रामाने त्यांना केला आणि त्या उपदेशानुसार पुढे आयुष्यभर श्री समर्थांनी जगदोद्धार आणि धर्मसंस्थापनेचे कार्य केले.

नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट….

श्री समर्थांनी आपल्या हयातीतच लोकोद्धार केला असे नाही तर आपल्या पश्चातही ज्या ज्या लोकांना आत्मकल्याण करून घ्यायचे आहे त्यांच्या करता ग्रंथरूप शिदोरी देऊन ठेवली. आपले अवतार कार्य समाप्त करण्याच्या अंतिम समयी त्यांनी शिष्यांना धीर देत सांगितले

नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट II तेणे सायुज्याची वाट ठायी पडे II

आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध I असता न करावा हो खेद I भक्तजनी II

अर्थात, “मी जरी देहरुपाने तुमच्या जवळ नसलो तरी माझे ग्रंथ हे माझेच स्वरूप आहेत आणि ते तुम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरतील”. आणि खरोखरच त्यांचे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात देखील श्री सार्थांचे साहित्य अगदी प्रासंगिक आणि मार्गदर्शक ठरत आहे. परमार्थाच्या पहिल्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीपासून ते त्याच्या सर्वोच्च शिखरावर उभ्या असणाऱ्या महापुरुषास आणि अगदी पारमार्थिक नसणाऱ्यास देखील समर्थांचे ग्रंथ यथार्थ मार्गदर्शन करतात.

आधी प्रपंच करावा नेटका….

तीर्थाटनाच्या कालावधीत श्री समर्थांनी केवळ देवळांना भेटी देऊन दर्शने घेतली असे नाही तर संपूर्ण भारत देश पायी फिरून लोकस्थितीचे अगदी जवळून अवलोकन केले. लोक राहतात कसे, बोलतात कसे, विचार कसे करतात, त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या अवनतीची करणे काय आहेत हे त्यांनी नीट समजावून घेतले. त्यामुळेच शुद्ध परमार्थ उपदेश करण्याआधी लोकांना व्यावहारिक शहाणपण-चातुर्य, कर्मशीलता यांचा उपदेश करण्याची त्यांना आवशकता भासली. म्हणूनच त्यांच्या दासबोधात अगदी प्रारंभीचे समास म्हणजे अध्याय हे अध्यात्मपर नसून व्यवहारिक शहाणपण सांगणारे आहेत. परमार्थाच्या नावाखाली आळस जोपासणे, आपल्या विहित कर्तव्यांपासून दूर जाणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. म्हणूनच ते दासबोधात म्हणतात-

आधी प्रपंच करावा नेटका| मग घ्यावें परमार्थविवेका |येथें आळस करूं नका| विवेकी हो ||१||

प्रपंच सांडून परमार्थ कराल| तेणें तुम्ही कष्टी व्हाल |प्रपंच परमार्थ चालवाल| तरी तुम्ही विवेकी ||२||

श्रीमत् दासबोध दशक १२ समास १

अथवा

आळस उदास नागवणा| आळस प्रेत्नबुडवणा |आळसें करंटपणाच्या खुणा| प्रगट करिती ||१२||

म्हणौन आळस नसावा| तरीच पाविजे वैभवा |अरत्रीं परत्रीं जीवा| समाधान ||१३||

श्रीमत् दासबोध दशक ११ समास ३

येथे विस्तारभयास्तव अधिक वचने देण्याचे टाळत आहे परंतु वाचकांना विनंती आहे की त्यांनी मुळातून दासबोधातील हे समास अवश्य वाचावेत. या सर्वाचा सारांश हा की परमार्थाच्या नावाखाली देवभोळेपणा करत अंधश्रद्ध होऊन, आळशी होऊन परमार्थ होणार नाही तर प्रयत्नवादाच आश्रय घेऊन सतत सारासारविचार करून आधी प्रपंचाचे गाडे सुव्यस्थित मार्गवर आणून मग परमार्थ मार्गावर वाटचाल करायला हवी.

परमार्थ सांडून प्रपंच करिसी|तरी तूं येमयातना भोगिसी….

समर्थांनी आधी प्रपंच करायला सांगितला आहे याचा अर्थ ऐन तारुण्यात किंवा जीवनाच्या उमेदीच्या काळात यथेच्छ भोग विलासात रमायला सांगितले आहे असे नव्हे. आपली विहित प्रापंचिक कर्तव्ये आधी पार पडून मग अन्यत्र व्यसनांत अथवा निकृष्ट बाबतीत मौज मजा करण्यात वेळ न घालवता त्या वेळेत परमार्थ करणे त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे प्रपंच चालू असतानाच परमार्थही करणे आवश्यक आहे असे ते आठवणीने सांगतात-

प्रपंच सुखें करावा| परी कांहीं परमार्थ वाढवावा |परमार्थ अवघाचि बुडवावा| हें विहित नव्हे ||१०३||

श्रीमत् दासबोध दशक ५ समास ३

अथवा

परमार्थ सांडून प्रपंच करिसी|तरी तूं येमयातना भोगिसी |अंतीं परम कष्टी होसी|येमयातना भोगितां ||४||

श्रीमत् दासबोध दशक १२ समास १

अर्थात प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधण्याचा श्री समर्थ उपदेश करत आहेत आणि त्यासाठीचे  वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, वैचारिक सुस्पष्टता कशी असावी याचे अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन त्यांनी दासबोधात केले आहे.

मुलुख बडवावा की बुडवावाI धर्मस्थापनेसाठी…

कोणत्याही राष्ट्राची ऐहिक आणि पारमार्थिक प्रगती, ते राष्ट्र स्वतंत्र असेल तरच अधिक चांगली होऊ शकते. पारतंत्र्यात या दोन्ही प्रगती शक्य नाहीत हे समर्थांनी अचूकपणे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी समाजाला बलसंपन्न होण्याचा उपदेश केला. समर्थ म्हणतात-

शक्तीने मिळती राज्ये I युक्तीने येत्न होतसे

आणि मग शक्ती संपन्न होऊन 

देव मस्तकी धरावाI अवघा हलकल्लोळ करवाII

मुलुख बडवावा की बुडवावाI धर्मस्थापनेसाठीII

साडेतीनशे वर्षांपूर्वी परकीय आक्रमकांच्या टाचांखाली पिचलेल्या या राष्ट्राला श्री समर्थांनी स्वाभिमान, बलोपासना, व्यवहारचातुर्य आणि आधात्माची संजीवनी देऊन पुन्हा जिवंत केले. इतकेच नव्हे तर त्यांनी देह ठेवल्यानंतरही न्यायमूर्ती रानडे, ना. गोपाल कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार यांसारख्या राष्ट्रनिर्माण करणाऱ्या लोकनायकांना श्री समर्थ साहित्य मार्गदर्शक ठरले.

श्री समर्थांचा सामान्य मानवी जीवनापासून ते राष्ट्र जीवनापर्यंतसर्वांनाच चैतन्य देणारा संजीवनी मंत्र त्यांच्या साहित्यात जागोजागी आढळून येतो. त्या संजीवनी मंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो कायमच प्रासंगिक असून त्यात मृतवत मानवी मन, मानवी समाज आणि राष्ट्र यांना जिवंत करण्याचे सामर्थ्य अजूनही सामावलेले आहे. आवश्यकता आहे ती त्या मंत्राच्या जागराची.

रोहित वाळिंबे

संदर्भ-श्रीमत् दासबोध

श्री समर्थांच्या समर्थ लीला- प. प. भगवान श्रीधर स्वामी

श्री दासायन- अनंतदास रामदासी

आधुनिक राष्ट्रवादाचे उद्गाते समर्थ रामदास- रविकिरण साने

पाखंड खंडिणी ब्लॉग- तुकाराम चिंचणीकर

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *