बाळासाहेब देवरस : रा. स्व. संघाचे सुकाणु


बाळासाहेब देवरस हे संघाचे तृतीय सरसंघचालक. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हे प्रथम, श्री गुरूजी हे द्वितीय सरसंघचालक व श्री गुरूजींनी नियुक्त केलेले तृतीय सरसंघचालक हे मा. बाळासाहेब देवरस. ज्येष्ठ शु.प्रतिपदा अर्थात या वर्षी 31मे रोजी पू. बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी आहे.

सामान्यपणे एखाद्या संस्थेमध्ये तिसरा प्रमुख येईपर्यंत त्या संस्था संघटनेची गादी अथवा पीठ बनलेले असते व कर्मकांड अथवा रितीरिवाज पाळणे,नव्हे सांभाळणे एवढाच सोपस्कार शिल्लक राहिलेला असतो. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या प्रवाही संघटनेला सोपस्काराचे साचलेपण येऊ न देता ती कालोचित व प्रवाही तसेच मूळ उद्दीष्टापासून यत्किंचितही विचलित न होता, सुयोग्य मार्गावर ठेवण्याचे सुकाणूचे दैवी कार्य मा.बाळासाहेब देवरस यांनी केले व ते त्यांचे योगदान आज त्यांची स्मृती म्हणून आठवू या.

डॉ. हेडगेवार हे या विचाराचे व आचाराचे निर्माते असल्याने त्यांचे जीवन व ध्येय हे एकरूपच होते. पण त्या नंतरचे सरसंघचालक श्री गुरूजी हे वैयक्तिक आयुष्यात नि:संग साधु असल्यामुळे वेगळ्या अर्थाने एक आगळावेगळ व्यक्तिमत्त्व होते. संघ धुरा ही संघाच्या बाल्यावस्थेत त्यांच्या सारख्या वेगळ्याच घडणीच्या व्यक्तीच्या हाती आल्याने संघाचे संगोपन व वाढ ही प्रामुख्याने त्यांच्या हातून घडली. व त्यामुळे संघ कार्यातील अनेकोनेक मापदंड हे श्री गुरुजींनीच पाडून दिले होते.

पण तृतीय सरसंघचालक यांची संघ प्रमुख म्हणून स्थिती पूर्ण भिन्न होती. ते संघटनेतील कार्यकर्ते होते. डॉ हेडगेवार यांच्यासारखे ते निर्माते नव्हते किंवा श्री गुरूजींसारखे अध्यात्मिक झळाळी असणारे व्यक्तिमत्व नव्हते. अशा व्यक्तिकडे रा स्व संघाची जबाबदारी आली होती. व रा स्व संघाची ओळख ही प्रामुख्याने धर्म, संस्कृती, देश, वैभवशाली परंपरा अशी असल्यामुळे व श्री गुरूजींसारखे विरागी नेतृत्व सतत ३३ वर्षे समोर दीपस्तंभासारखे असल्यामुळे या संघटनेला कालोचित दिशा देणे हे किती अवघड काम होते हे आपण समजू शकतो.

अधिक वाचा  डॉ. हेडगेवारजींचा स्वातंत्र्यलढा : 100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक महान क्रांतिकारी व स्वातंत्र्य सेनानी पूज्य डॉ. हेडगेवार यांची कारागृहातून सुटका झाली.

अशा परिस्थितीत मा. बाळासाहेब देवरस यांनी हे दिशादर्शन कसे केले हे समजून घेऊ यात.

श्री गुरूजींच्या निधनानंतर स्वयंसेवकांना नवीन सरसंघलकांचा परिचय होत असतानाच आणिबाणी व संघबंदी आली. व नूतन सरसंघचालक हे संघटनेसाठी व देशहितासाठी कोणत्या गुणवत्ता घेऊन आले आहेत हे सर्व संघाला व नंतर समाजाला समजले. त्यावेळचे त्यांचे प्रसिद्ध वाक्य एक सरसंघचालक अटेकत आहेत तर दहा बाहेर आहेत. हे सर्वांना समजले की संघटनेच्या वाढत्या व्यापात व हिंदू मानसिकतेतील स्वाभाविक लोकशाही ही संघातही आहे व संघ संघटन ही सामुहिक नेतृत्व प्रक्रिया आहे. एकचालकानुवर्तित्व पासूनचा प्रवास संघाच्या योग्य वयात सामुहिक नेतृत्वात सहजपणे मा. बाळासाहेब यांनी बदलून दाखवला. हा बदल मागणी म्हणून आला असता तर खळबळ झाली ही असती पण हा जो प्रमुख यानेच करून दाखवला.

संघ पुरेसा दखलपात्र झाला आहे त्यामुळे संघाच्या सामाजिक भूमिका अता समाजापर्यंत नीट पोहचवण्याची वेळ आली आहे हे ओळखून प्रथमतः मा. बाळासाहेब यांनी सामाजिक व्यासपीठावरून सामाजिक समता व हिंदू संघटन हा विषय समाजासमोर वसंत व्याख्यानमाला या व्यासपीठावरून मांडला. पण फक्त हा विषय मांडला असे नाही तर बदल घडवण्याची सुयोग्य कार्यपध्दती समाज व स्वयंसेवक दोघांनाही समजावून सांगितली. आले माझ्या मनी असे समाज परिवर्तन प्रक्रियेत चालत नाही तर समाज व सहकारी यांना विश्वासात घेऊन सर्वांनी करण्याची प्रक्रिया आहे हे समजावून दिले. त्या भाषणाची प्रत खूप आधी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना पाठवून सूचना घेऊन मांडली होती. हे सामुदायिक मन तयार करण्याची बाळासाहेब रीत होती.

अधिक वाचा  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल शिक्षणपद्धती कशी असावी?

एवढेच कशाला संघात व्यक्तीस्तोम शिरू नये म्हणून ही ते अत्यंत जागरूक असत. संघाच्या कार्यक्रमात डाॅक्टर, गुरूजी व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असतात. यात यापुढे सरसंघचालकांनी प्रतिमा वाढणार नाही हे स्पष्ट केले होते. संघटन तत्वाधिष्ठितच राहील ही परोपरीने काळजी बाळासाहेब देवरस घेत असत.

हिंदू समाज संघटित होण्यात एक कच्चा दुवा होता जो दूर करण्यासाठी समाजमन तयार करणे व संघाला सज्ज करणे ही दोनही कामे राष्ट्र सर्वप्रथम मानणा-या बाळासाहेब देवरस यांनी लिलया करून दाखवले. हिंदू हिताला मत ही स्वामी चिन्मयानंद यांच्या घोषणेचे जनक म्हणजे बाळासाहेब देवरस. व त्यासाठी सामाजिक हिंदू मन तयार करण्यासाठी सामाजिक घुसळणीच्या असंख्य कार्यक्रमांची छडीच लावली गेली.

संघटनेसाठी संघटना हा उदघोष योग्य वळणावर संघटनेला समाज संघटन व समाज जागरण प्रक्रिया यामध्ये परिवर्तित करण्याची अवघड प्रक्रिया बाळासाहेब देवरस यांनी पूर्ण करून दाखवली. व राजकीय संघर्षासाठी समाजाची अंतिम तयारी जी सर्वात अवघड होती ती मा. बाळासाहेब देवरस यांनी सुरू केली. ती म्हणजे अयोध्या राममंदिर. हा संपूर्ण देश फक्त तेंव्हाच एकत्र संघर्ष करतो ज्यावेळी सांस्कृतिक राष्ट्रवाद ह्या सिद्धांतावर संघर्ष आधारित असतो. संघ यशाची व सांस्कृतिक राष्ट्रवाद विजयाची प्रासाद चिन्हे ही अशी बाळासाहेब देवरस यांनी पेरली नाहीत तर शेवटच्या टोकापर्यंत स्वतः नेऊन ठेवली होती.

अधिक वाचा  वास्तववादी परराष्ट्र धोरणाचा पाया रचणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मी असा भाग्यवान आहे की मा. बाळासाहेब देवरस यांच्याकडून मला संघाच्या मूलभूत चिंतन व क्रियान्वयन काही प्रमाणात समजावून घेता आले. शहाबानो प्रकरणात संघाने संघर्ष करावा असे वाटणा-या मला त्यांनी सांगितले की युध्द हे दुस-याने निवडलेल्या भूमिवर नाही तर आपण ठरवलेल्या मैदानावर लढायचे असते. आणि थोडे दिवसांनी मला अर्थ कळला ज्यावेळी संघाने अयोध्या आंदोलनामध्ये भाग घेतला.

बाळासाहेब देवरस यांनी स्वयंप्रतिभेने संघ चालवला. फक्त गतानुगतिक नाही तर कालोचित परिवर्तनासह व सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व बरोबरीच्या कार्यकर्त्यांमध्ये असतानाही प्रमुख म्हणून व इतक्या पारदर्शीपणे की बरोबरीचा एकही कार्यकर्ता न दुखावता.

अशा संघसमर्पित पण स्वतंत्र प्रतिभेच्या तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस पूण्य स्मरणानिमित्य यांचे एका वेगळ्या पैलूचे स्मरण.

सुनील देशपांडे

पुणे

९४२०४९५१३२

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love