मुलखावेगळ्या नारीशक्तीच्या कार्याचा जागर: आरोग्यदूत – प्रतिभा आठवले

महाराष्ट्र लेख
Spread the love

नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत तर त्याच्या पाठीमागे समर्थ व्यक्तींच्या तपश्चर्येचे  बळ असणे आवश्यक असते आणि त्यामुळेच अशी मूल्ये चिरस्थायी होतात. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. आपण   भारतीय तर आपल्या देशाला मातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो.

भारतमातेच्या आराधनेचा सूर भारून जातो तो समर्पणाच्या संगीताने! जीवनात अनेकवेळा आपल्याला आपल्या आसपास विविध रूपात नारीशक्तीचा अनुभव येत असतो. त्यामध्ये आगळीवेगळी, सहज वाटणारी पण प्रत्यक्षात अतिशय खडतर कामे करून, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कामातून शक्तीची उपासना करणाऱ्या अनेक सख्या पाहिल्या. कोरोना महामारीच्या काळात सेवा कार्याच्या माध्यमातून असे अनेक अनुभव आले. कोणी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले तर  कोणी कोरोना रुग्णांची सेवा केली, कोणी डबे पोहोचवून खारीचा वाटा उचलला. अशा मुलखावेगळ्या नारीशक्तीच्या कार्याचा जागर करण्याचा हा प्रयत्न.                                                                   

आरोग्यदूत –  प्रतिभा आठवले

 ‘नीज परम हितार्थ’ या भावनेने पूर्वांचलसह काश्मीर, लडाख येथे जाऊन महिलांच्या अत्यंत नाजूक दिवसांची आरोग्यपूर्ण काळजी घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी   आपले तन – मन – धन अर्पण करून निरपेक्ष वृत्तीने आणि जिद्दीने कार्य करणाऱ्या अहमदाबादच्या डॉ. प्रतिभा आठवले या ध्येयवेड्या भगिनीच्या सेवाकार्याची ही ओळख.

विवेकानंद केंद्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सेवाभारती या संस्थांच्या माध्यमातून आपल्यातील एका भगिनीला प्रेरणा मिळाली आहे. सेवाभावी वृत्तीने डॉ.प्रतिभा आठवले यांनी पूर्वांचलमधील अरुणाचल, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा तसेच मिझोराम – नागालँड या उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा दुर्गम राज्यांमध्ये दंत चिकित्सा विषयक अनेक विनामूल्य शिबिरे घेऊन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. जेथे कोणत्याच कारणासाठी डॉक्टर पोहोचू शकले नाही अशा अतिशय प्रतिकूल भागातील नागरिकांचा आशेचा किरण बनून संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी सातत्याने २० वर्षे काम करून प्रतिभाताईंनी आपल्या कामातून एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.

🔸🔸 खरेतर दंत चिकित्सेदरम्यान महिलांशी संवाद साधताना प्रतिभाताईंना स्थानिक मानसिकता, आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी, शिक्षणाचा अभाव, सुविधा आणि जनजागृती याबाबत कायकाय करायला हवे याची वास्तव माहिती मिळाली.

🔸🔸 सहज संवाद साधताना प्रतिभाताई थेट त्या महिलांच्या विश्वात गेल्या, शिबिरांच्या वेळी स्थानिक महिलांबरोबर होत असलेल्या संवादातून जाणवलं, की भारताच्या सीमावर्ती राज्यातील – डोंगराळ भागातील छोट्या छोट्या वस्तींमध्ये वैयक्तिक आरोग्याचा, स्वास्थ्य आणि स्वच्छता यांचा अभाव आहेच पण त्याचबरोबर जागृतीही कमी आहे, खास म्हणजे महिलांना मासिक पाळीच्या काळात वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅड्सच्या गरजेची उपयुक्तता माहीत नाही, पॅड्स उपलब्ध नाहीत व त्यांची किंमत परवडण्यासारखीही नाही. हे लक्षात आले आणि म्हणून त्यांनी स्वतः त्यावर विचार करून पॅड्स सोप्या पद्धतीने बनवून, निर्जंतुक करून आणि वापरल्यावर जाळून नष्ट करण्यासाठी एक छोटे, कमी किंमतीचे, सहज वापरता येणारे पोर्टेबल मशीन बनवले. (सुटकेस मॉडेल ) महाराष्ट्र- गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी ही मशिन्स त्यांनी दिली पण आहेत. काश्मीरमधल्या अधिक कदम यांच्या अनाथ मुलींच्या पाच वसतिगृहात पण ही मशिन्स त्यांनी दिली. या मशिन्सची उपयुक्तता लक्षात घेऊन जम्मू-कश्मीरमध्ये काम करत असलेल्या ‘सेवाभारती’च्या कार्यकर्त्यांनी ही मशिन्स कश्मीर घाटी आणि जम्मू परिसरातील डोंगराळ वस्तीमधल्या महिला गटांसाठी देण्याचे ठरविले. महिला सशक्तीकरणासाठीचं हे एक पाऊल!

🔸🔸विविध अवेअरनेस कॅम्प सोबतच महाराष्ट्र, काश्मीर, गुजरात, लडाख अशा विविध ठिकाणी  मशीन पाठवली आहेत आणि हे काम अव्याहतपणे सुरु आहे. या कामात  आलेले काही अनुभव  प्रतिभाताईंना लाखमोलाचा आनंद आणि समाधान देऊन गेले आहेत. कोल्हापूरमधील एका महिला पुनर्वसन केंद्रात पोलिओ किंवा अर्धांगवायू सारख्या आजाराने त्रस्त महिलांच्या केंद्रातील सर्व भगिनींना मोठी सुविधा देता आली त्यातून त्यांच्या स्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली. काश्मीर येथील मियाम येथे झालेल्या शिबिरानंतर स्थानिक सरपंचानी त्यांना तिरंगा भेट म्हणून दिला, ही अनमोल भेट प्रतिभाताईंच्या नेणीवेला स्पर्शून गेली.

डॉ. प्रतिभाताईंची समर्पित वृत्ती तसेच धाडस, जिद्द आणि चिकाटीला त्रिवार वंदन!                   

🔸♦️ सौ. अंजली तागडे ♦️🔸

संपादक,

विश्व संवाद केंद्र,पुणे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *