शिवाजीराव भोसले बँक घोटाळा: आमदार अनिल भोसले यांच्या अलिशान गाड्या जप्त


पुणे—पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनिल भोसले यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्यांच्या चार गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये एक लॅंड क्रुझर आणि एक कॅमरे गाडीचा समावेश आहे. दरम्यान, भोसले यांच्या आणखी  मालमत्तेचा पोलिसांनी शोध घेतला असून सुमारे ३० कोटी मालमत्तेचा जप्ती प्रकरणी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनिल भोसले हे  पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे आमदार म्हणून निवडून गेले आहेत. नंतर २०१७  च्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या पत्नी रेश्मा या भाजपकडून पुणे महापालिकेत निवडून  गेल्या आहेत. भोसले हे गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

अधिक वाचा  सिद्धू मुसेवाला हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या पुण्याचा शार्प शूटर संतोष जाधवच्या मुसक्या आवळल्या

बॅंकेत ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने फिर्यादी यांच्या कंपनीला बॅंकेच्या रोख व शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते. यावेळी बॅंकेकडे ७१  कोटी ७८  लाख ८७  हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्थिक गुन्हे शाखेने तपास केला. त्यामध्ये कर्जप्रकरणांमध्ये तब्बल ८०  कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आणखी एका संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच बॅंकेतील ठेवी, कर्ज प्रकरणे आदीचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या ऑडिटर कंपनीचीही चौकशी करण्यात आली.

बॅंकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या अर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले होते. एकावेळी एका व्यक्तीला एक हजार रूपये काढण्याचा अधिकार दिला होता. असे असतानाही दिड कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आल्याची माहिती पोलिस तपासामध्ये पुढे आली होती.

अधिक वाचा  मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी केला खून

 या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले, सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले या चौघांना पोलिसांनी यापुर्वी अटक केली आहे. तर याप्रकरणी एकूण 16 आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love