पुणे(प्रतिनिधि)–“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत बाब आहे. पण अजित पवारांना सोबत घेऊन त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. उलट नागरिकांमध्ये भाजपवरची जी काही नाराजी होती त्याचा अजित पवारांनाच फटका बसला असेल, असे म्हणणे योग्य ठरेल”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मिळालेल्या अपयशानंतर अनेक स्तरातून या निवडणुकीबाबत भाष्य केले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून देखील या निवडणुकीचे विश्लेषण करण्यात आले. रतन शारदा यांनी ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकामध्ये याबाबत लेख लिहला आहे. या लेखामध्येही अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे म्हटले आहे. संघ आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीतही अजित पवारांमुळे भाजपचं नुकसान झाले असल्याचे अनेक नेत्यांनी बोलून दाखवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या,‘असो… ती चर्चा किंवा ती बैठक या सर्व आरएसएसच्या अंतर्गत बाबी आहेत. मला त्या चर्चेबाबत काही बोलायचे नाही. त्यांनी कोणती चर्चा करावी किंवा कोणती चर्चा करू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, अजित पवारांमुळे भाजपला फटका बसला याबाबत महायुतीत कसलीही चर्चा नाही, असे कोणीही कोणाबरोबर बोललेले नाही’.















