पुणे(प्रतिनिधि)—वादग्रस्त विधानांमुळे नेहेमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते दळभद्र आणि हांडगं स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले.
संभाजी भिडे यांनी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतले. भीडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानचे धारकरी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात. रविवारी पुण्यामध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे आगमन झाले. तत्पूर्वी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं. तेव्हा वटपौर्णिमेबाबत त्यांनी हे विधान केलं आहे.
ते असेही म्हणाले की,ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अशा १०-१० हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला १० हजारांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाला ते दळभद्री आणि हांडगं स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे.
आपल्याला वारकरी-धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. कुत्र्याला लांबचं ऐकायलं येतचं. वटवाघळाला येतं. त्याचबरोबर गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या रक्षणसााठी वाटेल ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय. ह्या व्रताची काही पथ्य आहे. त्यामुळंच वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलानी जाऊ नये, तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीचं जावं, असं वक्तव्य भिडेंनी केलं.
दरम्यान, भिडेंच्या या वादग्रस्त वक्तव्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. आज पालखीला मानवंदाना करताना कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या होत्या.