पुणे–कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी चार्जशीट प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
गृहमंत्री देशमुख यांनी आज कारागृहाला भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, येरवडा कारागृहातील अधिकाऱयांच्या राज्य शासनाकडून काही मागण्या होत्या. त्यासंदर्भातील निवेदन स्वीकारण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. सद्यस्थितीत येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता वाढविण्यासाठीचे निवेदन दिले आहे. या कारागृहात वेगवेगळय़ा प्रकारचे कैदी आहेत. त्यामुळे येरवडा कारागृहाच्या पुनर्रचनेचा विचार करण्यात येत आहे.
नमस्कार, मी गृहमंत्री बोलतोय…
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात जाऊन मध्यरात्री पोलिसांबरोबर नव्या वर्षाचे स्वागत केले. त्या वेळी त्यांनी नियंत्रण कक्षात आलेला फोन घेतला व तक्रारदाराची तक्रार ऐकून घेतली. नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, तुमची काय तक्रार आहे, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर ‘आमच्याकडे सोसायटीत खूप आवाज सुरू आहे तो कमी करायला सांगा,’ अशी तक्रार प्राप्त झाली. 12 वाजून 2 मिनिटांनी ही तक्रार आली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पुढील आदेश दिला. त्यानुसार पुढच्या 3 मिनिटांत सिंहगड पोलीस ठाण्याचे वरि÷ पोलीस निरीक्षक शिवसागर सोसायटीत पोहोचले आणि तेथील आवाज बंद झाला. त्या अगोदर देशमुख यांनी सर्वांबरोबर केक कापला.
पोलिसांसोबत नववर्षाची सुरुवात केल्याचा आनंद : अनिल देशमुख
याबाबत देशमुख म्हणाले, गेले 10 महिने पोलीस, डॉक्टर, परिचारिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. पोलीस थकले जरूर आहेत. पण हिंमत हरलेले नाहीत. कोरोनविरुद्धच्या या लढाईत एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्याबरोबर नव्या वर्षाची सुरुवात करायला मिळाली, याचा मला आनंद आहे. तसाच आनंद त्यांनाही झाला असेल. हे नवीन वर्ष निश्चितच कोरोनामुक्त असेल. ‘थर्टी फर्स्ट’ची रात्र ही सर्वसामान्य जनतेसाठी ‘सेलिब्रेशन’ची असली, तरी पोलिसांना मात्र डोळय़ात तेल घालून जागरूक राहावे लागते. म्हणूनच नववर्षाच्या स्वागताच्या क्षणी पोलिसांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. इतक्मया रात्री एखाद्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्तालयात असण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग होता.