पुणे(प्रतिनिधि)–कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणुक आपण पक्ष म्हणून लढवत आहोत. उमेदवारांनी आपल्याला नमस्कार करावा, अशी अपेक्षा न ठेवता आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून प्रत्येकाने काम करावे, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. ही निवडणुक आपली ताकद दाखवण्याची आणि आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात करण्याची चांगली सुरुवात आहे, असेही पटोले म्हणाले.
कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी काँग्रेस भवन येथे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पटोले बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, संगीता तिवारी, अजित दरेकर, विशाल मलके आदींसह काँग्रेसच्या सर्वच आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी व मतदान होण्यासाठी काय उपाय योजना केल्या जात आहेत, पुढील दिवसात काय काम केली जाणार आहेत, याची माहिती दिली.
पटोले म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जेवढ्या मताने मागे होता, तो लिड तोडून आपणास भाजप उमेदवारावर तेवढाच लिड घ्यायचा आहे. आपण ही पोटनिवडणुक पक्ष म्हणून लढवत आहोत. त्यामुळे आपणास आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ला उमेदवार समजून काम करणे गरजेचे आहे. पुण्यात अनेक मोठे नेते तयार झाले आहेत, पुणे हे राजकारणाचे माहेरघर आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने आपणास राजकीय जीवनाची सुरूवात करण्याची चांगली संधी मिळाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडूनही शिकण्याची संधी आपणास मिळणार आहे. मतदार संघात २७० बुथ आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडणे गरजेचे आहे.
डॉक्टर सेलच्या सदस्यांनी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना शासनाच्या चुकीच्या धोरणांची व कामाची माहिती देवून त्यांचे मत परिवर्तन करून त्याचे रुपांतर महाविकास आघाडीचा उमेदवारास कसे मिळेल, यासाठी काम करणे गरजेचे आहे. इतर सेलच्या पदाधिकाऱ्यांनीही राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची, खासगीकरणाची, बेरोजगारी, महागाई याबाबतीत नागरिकांना माहिती देवून काँग्रेस पक्षच नागरिकांना न्याय देवू शकते, हे पटवून दिले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
राजीव गांधी रेडिओचे लाँचींग
काँग्रेस पक्षाच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास सेल तर्फे काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाचा आणि इतिहाचा, तसेच चालू घडामोडींचा प्रचार करण्यासाठी राजीव गांधी रेडिओचे आज उदघाटन माननीय प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले ह्यांच्या हस्ते झाले. सदर रेडिओ ऍप हे गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. ह्यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, अमीर शेख, सेलचे महाराष्ट्र प्रमुख सुरेश यादव, तसेच सेलचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत चव्हाण उपस्थित होते, प्रोफेशनल्स काँग्रेसचे यशराज पारखी, दाहर मुजावर, मिलिंद गवंडी उपस्थित होते.