पुणे- राज्यातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह सोळा आमदारांच्या पात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray) यांनी फ्लोअर टेस्टला (floor test ) सामोरे ने जाता राजीनामा दिल्यामुळे परिस्थिति पूर्ववत केली जाऊ शकत नसल्याचे निरक्षण नोंदवले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत बोलताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यपालांच्या भूमिकेचं सुद्धा वस्त्रहरण झालेलं आहे. आत्तापर्यंत राज्यपाल ही आदरयुक्त यंत्रणा होती पण राज्यपाल यंत्रणेचे धिंडोरे ज्या पद्धतीने शासनकरते काढतायेत ते बघितल्यानंतर आता याच्यापुढे राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही हा सुद्धा एक मोठा विचार करण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, अपात्रतेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांवरती जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा त्या वेळेचा जो पक्ष म्हणजे माझी शिवसेना त्या शिवसेनेचाच राहील. आता अध्यक्ष महोदयांना सुद्धा याच्यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच्यासाठी आम्ही आता मागणी करू. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा आलेला आहे. मला खरंच एका गोष्टीचा समाधान आहे मी वारंवार असं म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल तर तो आपल्या देशातल्या लोकशाहीच्या बद्दल, लोकशाही जिवंत राहणार की नाही याबद्दलचा असेल आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचे उघडे नागडे राजकारण करणाऱ्यांची त्यांनी पूर्णपणे चिरफाड केलेली आहे.
राज्यपाल येतील आणि कोणाचे 12 वाजवून जातील. मात्र ,मग त्यांना सजा काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला? राज्यपालांवरही कारवाई झाली पाहिजे हे माझं मत आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. विधानसभा अध्यक्ष आणि आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा माझ्या शिवसेनेचा व्हीप लागू होणार असा उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जायला हवे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो. परंतु, ज्यांनी सगळं घेऊनही माझ्या पाठीत वार करावा आणि माझ्यावर अविश्वास आणावा हे मला मान्य नाही. विश्वासघात करणाऱ्यांकडून माझ्यावर अविश्वासदर्शक ठराव यावा हे मला अमान्य होते म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मी एका क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यांनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता शिल्लक असेल, तर मी दिला तसाच त्यांनीही राजीनामा द्यायला हवा. अशी मागणीही त्यांनी केली.