हवा प्रदूषण : एआरएआय संस्थेने तयार केली पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’


पुणे–पुण्यातील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ( एआरएआय) या संस्थेतर्फे हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारी प्रदूषके आणि त्यांचे स्रोत यांचा समावेश असलेली ‘एमिशन इनव्हेनटरी’ अर्थात ‘उत्सर्जन यादी ‘ तयार करण्यात आली आहे. ही एक व्यापक जिल्हास्तरीय यादी असून, हवा प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

देशातील हवेच्या प्रदूषण समस्येचा सामना करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शुद्ध हवा प्रकल्प (एनकॅप) मोहीम अंतर्गत २०१९ सालापासून ‘क्लीन एअर प्रोजेक्ट इंडिया’ ( कॅप इंडिया) हा प्रकल्प राबविला जात आहे.  देशातील लखनौ, कानपूर, नाशिक आणि पुणे या चार शहरांमध्ये विविध संस्थांच्या सहाय्याने हा प्रकल्प राबविला जात असून, एआरएआयतर्फे पुण्यात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे नेतृत्व नवी दिल्ली येथील ‘तेरी’ ही संस्था करत आहे. स्वित्झर्लंड येथील स्विस एजन्सी फॉर डेव्हलमेंट अँड को – ऑपरेशन (एसडीसी)  संस्थेने या प्रकल्पासाठी सहकार्य केले असून, संपूर्ण प्रकल्पासाठी संस्थेतर्फे सुमारे ४० कोटी रुपये इतका निधी देण्यात आला आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) यांना हवा प्रदूषण रोखण्यासाठी योग्य कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

अधिक वाचा  शैक्षणिक संशोधनातील जागतिक सहकार्याला मिळणार आणखी चालना

एआरएआय येथे आयोजित पत्रकार परिषदेत  याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ‘उत्सर्जन यादी’ अहवाल देखील प्रकाशित करण्यात आला. या परिषदेला एआरएआय’ चे वरिष्ठ उपसंचालक आनंद देशपांडे, डॉ. एस.एस. ठिपसे, महाव्यवस्थापक मौक्तिक बावसे, तेरी संस्थेचे क्षेत्र संयोजक आर. सुरेश, एसडीसी’चे नवी दिल्ली येथील प्रमुख डॉ. जोनाथन डेमेंज, कार्यक्रम अधिकारी आंद्रे डॅनियल म्युलर, वरिष्ठ सल्लागार डॉ. आनंद शुक्ला, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, पुणे स्मार्ट सिटीचे चीफ क्नोलेज ऑफिसर अनिरुद्ध शहापुरे आणि हवेची गुणवत्ता व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या ‘उत्सर्जन यादी’ चे काम २०२१ सालात करण्यात आले असून, ३० जणांच्या समूहाने शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून ही यादी तयार केली आहे. यामध्ये हवा प्रदूषणाचे स्रोत ओळखण्यासाठी प्रत्यक्ष पाहणीसोबतच एमपीसीबी आणि पुणे महापालिकेने दिलेली माहिती आणि ‘हाय-रिझोल्यूशन’च्या उपग्रह प्रतिमा आणि जीआयएस साधनांचा वापर करण्यात आला आहे.

ही यादी सूक्ष्म स्तरावर तयार करण्यात आली असून, त्यासाठी १५,६४३ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला संपूर्ण जिल्हा २ किमी x २ किमी ग्रिडमध्ये विभागण्यात आला होता. याद्वारे जिल्ह्यात हवेच्या प्रदूषणासाठी सर्वाधिक  कारणीभूत ठरणारी पाच प्रमुख प्रदूषके निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये पीएम २.५, पीएम १०, कार्बन मोनोऑक्साइड (CO), सल्फर डायऑक्साइड (SO2) आणि ऑक्साइड ऑफ नायट्रोजन (NOX) यांचा समावेश  आहे. या प्रदूषकांचे स्रोत आणि त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे :

अधिक वाचा  शरद पोंक्षे यांच्यामध्ये नथुराम गोडसे यांचा अतिरेकी डीएनए आला आहे का? - गोपाळदादा तिवारी

पीएम २.५  :  वाहतूक – २०%, रस्त्यावरील धूळ – १९%, उद्योग – १९%, कृषी कचरा १०%, बांधकाम आणि संबंधित क्षेत्रे – १२ %, निवासी आणि उघडा कचरा जाळणे – प्रत्येकी ६ % आणि डिझेल जेन-सेट – ४ %.

कार्बन मोनोऑक्साइड  :  वाहतूक – ६१%, उद्योग – १८%, निवासी -८%, कृषी कचरा जाळणे – ५%.

पी एम १०  :   रस्त्यावरील धूळ – ३५%, बांधकाम आणि संबंधित क्षेत्रे – २३%, उद्योग – १४%, वाहतूक १०%, कृषी कचरा जाळणे – ४%, निवासी – ४%.सल्फर डायऑक्साइड :  उद्योग – ८४ %, डिझेल जेन-सेट – ६ %

नायट्रोजन ऑक्साइड : वाहतूक – ७१ %, डिझेल जेन-सेट – १५ % आणि उद्योग – ११ %

या अभ्यासाचे परीक्षण कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (आय आय टी) प्राध्यापक मुकेश शर्मा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिरॉलॉजी (आयआयटीएम), पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे यांनी केले आहे.

ही उत्सर्जन यादी हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक धोरण तयार करण्यासाठी एक पायाभूत आधार ठरणार असून, संबधित यंत्रणांना प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करण्यासाठी तिचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे.

अधिक वाचा  #Dagdusheth Ganpati : होळीपौर्णिमेनिमित्त 'दगडूशेठ' गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास 

याप्रसंगी बोलताना डॉ. ठिपसे म्हणाले, “ कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या दृष्टीने, एआरएआय संस्था सध्या ई२० या इंधन प्रकारावर  काम करत आहे. हे इंधन  पेट्रोल आणि इथेनॉलचे 20 टक्के मिश्रण आहे. यामुळे जीव इंधनाचा प्रसार होऊन, कमी उत्सर्जन आणि कमी प्रदूषण यासाठी हातभार लागणार आहे. तसेच भारताच्या कृषी क्षेत्राला देखील याचा फायदा होईल.’’

राष्ट्रीय हायड्रोजन मिशनबाबत डॉ. ठिपसे म्हणाले, “ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण, हायड्रोजन हे सर्वात स्वच्छ इंधन आहे. त्यात कार्बन नसतो. त्यामुळे आय सी  इंजिन आणि फ्युएल सेल वाहनांसाठी इंधन म्हणून त्याचा प्रचार केला जात आहे. सध्या या योजनेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत काम सुरु आहे.’’ 

आनंद देशपांडे म्हणाले, “ पुण्यात ई वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. विशेषतः इलेक्ट्रिक दुचाकी आणि बसेस’च्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हे निश्चितच सकारात्मक चित्र आहे.’’ 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love