35th Pune Festival Mahila Mahotsav inaugurated by Hema Malini

३५ व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ सप्टे. रोजी हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन : मिस पुणे फेस्टिव्हल, मिसेस पुणे फेस्टिव्हल, पेंटिंग, नृत्य, ब्रायडल मेकअप, पाककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- ३५व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवात यंदा मिस पुणे फेस्टिव्हल, मिसेस पुणे फेस्टिव्हल, पेंटिंग, नृत्य, ब्रायडल मेकअप, पाककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच महिला कीर्तनकारांचा महोत्सव हे देखील विशेष आकर्षण असणार आहे. या महिला महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता बालगंधर्व कलादालन येथे पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी दीपप्रज्वलन करून करतील. तसेच देशातील महिला चित्रकारांनी त्यांच्यावर रेखाटलेल्या ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’ पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनाचे देखील त्या उद्घाटन करतील. (35th Pune Festival Mahila Mahotsav inaugurated by Hema Malini)

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासूनच पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी महिला महोत्सवा अंतर्गत महिलांच्या विविध स्पर्धांना प्रोत्साहन दिले. महिलांच्या स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांच्या विविध स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे असे पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले. 

पेंटिंग स्पर्धा –  

पेंटिंग स्पर्धे बाबत संयोजिका निवेदिता प्रतिष्ठानच्या अॅड. अनुराधा भारती (मो. 9422078956) यांनी सांगितले की, देशातील ३५० हून अधिक महिला चित्रकारांच्या ‘आकृती’ ग्रुपतर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व कलादालन येथे ‘कॅनव्हास ऑफ अ ड्रीम गर्ल’ पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन शनिवार दि. २३ ते २५ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. याचे उद्घाटन शनिवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांच्या हस्ते होईल. विशेष म्हणजे या स्पर्धेत हेमा मालिनी यांचीच पोट्रेट किंवा त्यांच्या कोणत्याही चित्रपटाचे पोस्टर या महिला स्पर्धक काढतील. स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व चित्रांचे  प्रदर्शन तीन दिवस म्हणजेच शनिवार दि. २३ सप्टेंबर पासून सोमवार दि. २५ सप्टेंबर सकाळी १०.०० ते रात्री ८.०० पर्यंत भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असेल. हेमा मालिनी यांच्या पोट्रेट व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अन्य शंभर चित्रं प्रदर्शनात मांडली जातील.  

यामध्ये पेन्सिल स्केच, चारकोल, ऍक्रेलिक कलर, ऑइल पेंट, वॉटर कलर अशा सर्व माध्यमातून १८ x २२ पासून २२ x ३० इंच साइजच्या कॅनव्हासपर्यंत चित्र प्रदर्शित होणार आहेत.  त्याचप्रमाणे हेमामालिनी यांचे ऑइल पेंट व वॉटर कलर अशा दोन्ही माध्यमातून लाईव्ह पोट्रेट काढले जाणार आहे.

यंदाच्या वर्षी या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे, ‘आकृती’ ग्रुपच्या  पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून  आलेल्या 50 महिला चित्रकार, साधारण ८ फुट रुंद व १८ फुट लांब, कॅनव्हासवर पुणे फेस्टिवलच्या प्रसिद्ध ‘गणेशाची प्रतिमा’ असलेला लोगो, हाताने पेंट करून दोन्ही बाजूला ४-४ अशा अष्टविनायकाच्या प्रतिमा पेंट करून ‘पुणे फेस्टिव्हल’ला भेट म्हणून देणार आहेत. डॉ. राजेत्री कुलकर्णी प्राध्यापिका एस.एन.डी.टी. कॉलेज व श्रीमती हेमा जैन माजी प्राध्यापक जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. श्री राहुल बळवंत, प्रिन्सिपल अभिनव कला विद्यालय, पुणे यांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत. यासाठी प्रींट मीडीया पार्टनर वरद इन्फोटेक असून पहाडी नॅचरल व पिडिलाइट या दोन कंपन्यांकडून बक्षीस दिले जाणार आहेत.

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा –

मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे (मो. 9881149995) म्हणल्या की, ही देशामध्ये आकर्षण बनलेली आणि तरुणींमध्ये लोकप्रिय असलेली स्पर्धा यावर्षी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० ते सायं. ७.०० यावेळेत संपन्न होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक तरुणी पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, टी.व्ही. चॅनेल्स व मॉडलिंग क्षेत्रात चमकल्या आहेत. स्पर्धेचे यंदाचे ९वे वर्ष आहे. ही महिलांचे व्यक्तिमत्व आणि सौंदर्य या बरोबरच कुटुंब व समाजाबद्दलचा दृष्टीकोन, प्रेझेंटेशन अशा विविध पातळ्यांवर घेतली जाते.

१८ ते २८ वर्षे वयोगटातील ३०० युवतींनी यामध्ये भाग घेतला होता. त्यातून अंतिम फेरीसाठी २० तरुणींची निवड करण्यात आली. फिटनेस चाचणी, दंतचिकित्सा, नृत्य सराव, फोटो शूट इत्यादी निरनिराळ्या चाचण्या स्पर्धकांना पार पाडाव्या लागणार आहेत. त्याप्रमाणेच अंडर वॉटर फोटोग्रॅफीचाही यामध्ये समावेश असेल.

अंतिम फेरीत ३ भाग असून पहिल्या फेरीत लेहेंगा, साडी, घाघरा (एथनिक) अशी वेशभूषा असून या तरुणी स्वपरीचय करून देतील.  दुसऱ्या भागात पार्टीवेयर टॉप ही वेशभूषा असून त्यांची नृत्याची फेरी होईल त्यातून अंतिम फेरीसाठी 10 जणी निवडल्या जातील आणि अंतिम फेरीसाठी गाऊन अशी वेशभूषा असून प्रशोत्तरानंतर तिघींची निवड होईल त्यातील १ विनर व २ रनरअप असतील. याशिवाय बेस्ट टॅलेंट, मिस फोटोजनिक, बेस्ट फिटनेस, बेस्ट हेअर, बेस्ट स्माइल यांची निवडही केली जाईल.

रेधून डान्स अकादमीचे आशुतोष राठोड स्पर्धकांच्या तसेच अंतिम फेरीतील नृत्यरचना सादर करणार आहेत. भावेश भतेजा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. फैशन अँड डांस कोरियोग्राफर, ग्रूमिंग मेंटर, शो डायरेक्टर आणि कॉस्टयूम स्टाइलिस्ट जुई सुहास या सर्व महिला स्पर्धकांना पूर्वतयारी व प्रशिक्षण याचे मार्गदर्शन करीत आहेत. या वर्षीचे परीक्षक दिग्दर्शक योगेश देशपांडे, संगीत दिग्दर्शक विश्वजीत जोशी, अभिनेत्री ऋतुजा शिंदे, अभिनेता स्तवन शिंदे, नृत्य दिगदर्शक ओंकार शिंदे आणि फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र अपूर्वा चव्हाण हे आहेत. कोहिनूर ग्रुप याचे प्रायोजक आहेत.

मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा –

मिसेस पुणे फेस्टिवल स्पर्धेच्या संयोजिका अमृता जगधने (मो. 9637758906) यांनी सांगितले की, विवाहित महिलांसाठी ‘मिसेस पुणे फेस्टिवल’ व्यक्तिमत्व स्पर्धा बालगंधर्व येथे दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० ते ४.०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. यात २६ ते ३६ व ३७ ते ५० वर्ष असे दोन वयोगट असणार आहेत. १४० हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला आहे. यांची प्राथमिक निवड स्वपरिचय व प्रेझेंटेशन वरून केली जाईल व त्यातून अंतिम फेरीसाठी पहिल्या गटात १० व दुसऱ्या गटात १० अशा २० महिलांची निवड करण्यात येईल. त्यांचे सलग तीन दिवस ग्रुमिंग केले जाईल व त्यामध्ये टॅलेंट राऊंडही घेतली जाईल. स्पर्धेच्या दिवशी या निवड केलेल्या दोन्ही गटातील प्रत्येकी १० महिला स्वपरिचय व नंतरच्या फेरीत प्रश्न उत्तरे यांना सामोरे जातील. यातून ६ महिलांची निवड करण्यात येईल. यातून एक विजेती व दोन उपविजेत्या यांची निवड दोनही गटातून करण्यात येईल. रविबाला काकतकर, प्रचिती पुंडे व ओंकार शिंदे हे परीक्षक म्हणून काम बघणार आहेत. याची ग्रुमिंग डॉ. ऐश्वर्या जाधव करणार असून संयोजन अॅड. अमृता जगधने यांच्या समवेत अर्चना सोनावणे व आशुतोष जगधने करीत आहेत. या कार्यक्रमास मेकअपसाठी प्रायोजक वीएलसीसी व ब्लेझ अकॅडमी आहेत तर फोटोशूटसाठी प्राजक्ता जोगळेकर या आहेत. 

ब्रायडल मेकअप स्पर्धा –

ब्रायडल मेकअप स्पर्धेच्या संयोजिका दीपाली पांढरे (मो. 9923040444) यांनी सांगितले की, महिला महोत्सवा अंतर्गत यंदा पहिल्यांदाच  ब्रायडल मेकअप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलींच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी त्या दोन कुटुंबांना जोडल्या जातात, पत्नी धर्म स्वीकारतात त्या दिवशी चांगले दिसणे/सजणे हे ओघानेच आले. महिला सुंदर तर असतेच पण तिला देखणे बनवण्याचे काम मेकअप आर्टिस्ट करतात. त्या  मेकअप आर्टिस्टना पुणे फेस्टिवल हे व्यासपीठ निर्माण झाले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत महाराष्ट्रीयन नववधू किंवा साउथ इंडियन नववधू या दोन पैकी एक नववधूचा मेकअप करायचा आहे. या स्पर्धेत ६ बक्षिसे असणार आहेत. या स्पर्धेत १०० हून अधिक महिलांनी भाग घेतला असून यामध्ये मेकअप आर्टिस्ट स्पर्धेच्या वेळी सोबत आलेल्या मॉडेल्सवर त्या मेकअप करतील. या स्पर्धेचे परीक्षक अतुल सदय, अंजली जोशी आणि भक्ती साप्ते आहेत. यामध्ये प्रियाज डान्स अकॅडमी, प्री नृत्य अकॅडमी व फँटॅस्टिक फोर ग्रुप बहारदार नृत्य सादर करणार आहेत.

नृत्य स्पर्धा –

नृत्य स्पर्धेच्या संयोजिका संयोगिता कुदळे (मो. 9921030001) व दीपाली पांढरे (मो. 9923040444) असून या स्पर्धेच्या बाबत संयोगिता कुदळे यांनी सांगितले की, महिला महोत्सव अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धा गुरुवार दि. २५ सप्टे. रोजी दु. १२.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होतील. यामध्ये  १८ ते ३५ वर्षे आणि ३६ ते ५० वर्ष अशा २ वयोगटात ३ मिनिटाच्या एकल नृत्य स्पर्धा आणि १८ ते ५० वर्ष वयोगटात जास्तीत जास्त १० महिला स्पर्धकांचा समावेश असणाऱ्या ५ मिनिटांची समूह नृत्य स्पर्धा पार पडतील. फ्युजन बॉलीवूड, कथक, ओडीसी, कथकली, लावणी, लोकगीतांवर आधारीत नृत्ये यामध्ये सादर होतील. या स्पर्धेतील एकल नृत्य स्पर्धेसाठी दोन्ही वयोगटात ३२ महिला आणि १८-५० या ग्रुप मध्ये समूह नृत्यसाठी १२ ग्रुप्सनी भाग घेतला आहे. या नृत्य स्पर्धेचे परीक्षक नृत्य दिगदर्शक ओंकार शिंदे व अन्य आहेत.

पाककला स्पर्धा –

पाककला स्पर्धेच्या संयोजिका करूना पाटील (मो. 9860402780) यांनी सांगितले कि, यंदा महिला महोत्सवात पाककला स्पर्धेचे आयोजन सोमवार, दि. २५ सप्टें. रोजी दु. १२.०० ते सायं. ५.०० या  वेळेत ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, शिवाजी नगर येथे संपन्न होईल. यामध्ये 2 विभाग असून त्यात महिला आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी असे गट आहेत. या स्पर्धेत ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई/भगर, राळे यापैकी एक अथवा मिक्स भरड वापरून पदार्थ बनवायचे आहेत. दुसऱ्या विभागात गोड आणि तिखट पदार्थ यांचा समावेश असेल. पदार्थाची चव, पौष्टिकता, नाविन्य, सादरीकरण आणि स्वच्छ्ता गृहीत धरले जाणार आहे. पदार्थासोबत थोडक्यात लिहिलेली पाककृती असावी ज्यामधे वापरलेले जिन्नस आणि प्रमाणाचा उल्लेख असावा. या स्पर्धेत आतापर्यंत ५० महिलांनी सहभाग घेतला आहे. अंजली वागळे पाककला स्पर्धेच्या मेंटर आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे आणि मधुरा रेसिपीच्या मधुरा बाचल यांचा टॉक शो असणार आहे.

महिलांचा कीर्तन महोत्सव –

महिलांच्या कीर्तन महोत्सवाच्या संयोजिका ह.भ.प. कीर्तन विशारद निवेदिता मेहेंदळे (मो. 9850891512) यांनी सांगितले की, महिला महोत्सवा अंतर्गत नारदीय कीर्तन महोत्सव रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० ते ८.०० या वेळेत श्री हरीकीर्तनोत्तेजक सभेचे व्यास सभागृह, टेलीफोन एक्स्चेंज समोर, बाजीराव रस्ता येथे संपन्न होईल. यावेळी “वंदे विनायकम्” हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये नमनाचे श्लोक, सामुहिक नारदीय नमन, जयोस्तुते श्री महन मंगले हा अभंग आणि त्यावर आधारित पूर्वरंग युवती कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे सादर करतील.  त्याला अनुसरून उत्तररंगात महिलांची चक्री, झाशीची राणी, महाराणा प्रताप आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या राष्ट्रीय क्रांतीकारकांची चरित्रात्मक आख्याने व ३ बाल आख्याने असे विषय सादर होतील.

यात अनुक्रमे बालकीर्तनकार लोपामुद्रा सिंग, कौमुदी मराठे आणि अनुश्री ब्रम्हे, ह.भ.प. अर्चना कुलकर्णी, युवती कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे, ह.भ.प. निर्मला जगताप आणि संयोजिका कीर्तन विशारद ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे हे कीर्तनकार सहभागी होणार आहेत. यावेळी गौरी पवार (तबला), प्रांजली पाध्ये (हार्मोनियम), संध्या साठे (झांज व टाळ) आणि सहगायन माधवी राजे करतील.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरीकीर्तनोतेजक सभेच्या उपाध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. नंदिनी पाटील भूषवतील. यावेळी ज्येष्ठ सतार वादक उस्ताद उस्मान खाँ, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि वारकरी कीर्तनकार उल्हास पवार, प्रसिद्ध गायक दयानंद घोटकर व ज्येष्ठ संगीतकार नकुल तळवलकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अॅड. धनदा कुलकर्णी गदगकर करतील. वैद्य जेम्स आणि डायमंड, पुणे हे प्रायोजक आहे.    

महिला महोत्सवातील या सर्व स्पर्धांना प्रवेश फी नसून पुणेकरांनी या सर्व स्पर्धांसाठी आवर्जून यावे असे आव्हान पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी केले.

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *