क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची एक जाहिरात वर्तमानपत्रात वाचायला मिळाली, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या प्रमुख पदाची ही जाहिरात होती. अध्यासन केंद्राच्या प्रमुखपदाच्या व्यक्तीची पात्रता ही पीएच.डी. धारक हवी असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. जी व्यक्ती केवळ दीड दिवसच शाळेत गेली त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या साहित्याची उंची, ताकद व जादू किती मोठी होती याची कल्पना या प्रसंगातून येते.
लोकशाहीर, साहित्यरत्न अशा पदव्या लाभलेले अण्णाभाऊ नक्की कोण होते? त्यांनी समाजाला काय दिले? १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव या ठिकाणी भाऊराव सिद्धोजी साठे व वालुबाई यांच्या पोटी अण्णाभाऊंचा जन्म झाला. जन्मापासूनच दारिद्र्य, अस्पृश्यता व भेदभावाचं जीवन अण्णाभाऊंना जगाव लागलं. अण्णाभाऊंचं दीड दिवसांचं शिक्षण झालं असलं तरी परिस्थितीने त्यांना माणसं वाचायला शिकविली. यातून आलेला अनुभव व समाजाची दशा पाहून अण्णाभाऊंनी आपल्या जगण्याची दिशा ठरवली.
त्यांनी मुंबई गाठली व कामगार म्हणून जीवन व्यतीत केले. मित्रांकडून अक्षरओळख करून घेतली व संवेदनशील मनाने साहित्य निर्मितीस सुरुवात केली. स्वतःचे दुःख – दारिद्र्य न मांडता दुःख – दारिद्र्यात जगणाऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी व त्याचं प्रबोधन करत व्यवस्थेविरुद्ध आसूड ओढण्यासाठी त्यांनी काही विचारमूल्ये घेऊन आपल्या साहित्य निर्मितीला सुरुवात केली. देशाचे स्वातंत्र्य, स्त्रीचे शील, पुरुषाचा अभिमान व माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा या चार मूल्यांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते.
अशिक्षित, अज्ञानी समाजाच्या प्रबोधनासाठी त्यांना कळेल, रुचेल व आवडेल अशा लावणी, पोवाडा, गण कटाव यातून त्यांनी प्रबोधन केले. तमाशाचे त्यांनी रूप बदललं, गणपतीचे गुणगान करण्याऐवजी राष्ट्रपुरुष, राष्ट्र, कामगार, सामान्य माणसाचं गुणगान त्यांनी गणातून करायला सुरूवात केली तर स्त्रीला नाचविण्याऐवजी शेतकरी, कामगाराची बायको म्हणून त्यांनी ती स्त्री लोकनाट्यात आणली. पुढारी मिळाला, खापर्या् चोर, शेटजीचे इलेक्शन, अकलेची गोष्ट, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, मूक मिरवणूक, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, लोकमंत्र्यांचा दौरा, पेंग्याचं लगीन या गोष्टीतून त्यांनी समाजाची कथा व व्यथा मांडून लोकजागृती व समाज प्रबोधन केले, तसेच चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना या लोकनाट्यातून त्यांनी चपराकही दिली. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी लोकमंत्र्यांचा दौरा या लोकनाट्यावर त्याकाळात बंदी घातली होती आणि अण्णाभाऊ साठे, अमर शेख व द.ना.गव्हाणकर यांना अटक करण्यात आली होती. अण्णाभाऊंनी १४ लोकनाट्ये व तीन नाटके लिहिली.
त्यांच्या काव्याचे प्रकार तर असंख्य होते, लावणी, पोवाडा, कटाव याचबरोबर निसर्गगीत, स्फूर्तीगीत, शेतकरीगीत, गौरवगीत, प्रहारगीत व्यथा-शल्यगीत, भावगीत, गौळण, कामगारगीत यातून त्यांनी प्रबोधन केले व अत्याचार, हिंसाचार यांचा धिक्कारही केला. बंगालची हाक, पंजाब – दिल्ली दंगा, नानकीन नगरापुढे, स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा गिरणी कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा, अमळनेरचे हुतात्मे यासारख्या पोवाड्यातून व प्रसिद्ध अशा माझी मैना गावाकडे राहिली अशा लावणीतून त्यांनी प्रबोधन केले.
समाजातल्या अनिष्ट चाली- रिती, स्त्रियांचं होणारं शोषण, गरिबी, बेकारी यावर प्रहार करून व त्या संदर्भाने प्रबोधन करण्यासाठी त्यांनी खुळंवाडी, बरबाद्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा, चिरागनगरीची भूतं अशी १९ कथासंग्रहं लिहिली, भारतीय भाषांबरोबरच परदेशी भाषांमध्येही या कथा प्रकाशित झाल्या आहेत.
कथेबरोबरच त्यांनी कादंबरीच्या माध्यमातून वेदनांचे प्रकटीकरण केल्याचे दिसून येते. चित्रा, संघर्ष, चंदन, फुलपाखरु, मूर्ती, वैजयंता, आवडी, रत्ना, तारा, आघात, फकीरा, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात, मास्तर, धुंद, रानगंगा, अहंकार, गुलाम, मयुरा, आग, माकडीचा माळ, डोळे मोडीत राधा चाले, केवड्याचं कणीस, रानबोका, कुरुप व अग्निदिव्य अशा कादंबरीतून ग्रामीण व वंचित जीवनाचं दर्शन घडतं.
माझा रशियन प्रवास या प्रवास वर्णनातून रशिया व भारत या दोन देशांमधील आर्थिक व सामाजिक स्थितीची तुलना करून आपल्या समाजासमोर त्यांनी अनेक आदर्श उभे केले. यावर तीन नाटके लिहिली. इनामदार हे नाटक त्यांनी स्वतः सादर केले तर फकीरा या चित्रपटाची पटकथा लेखनही त्यांनी केले. उत्तम नट, गायक, संगीतकार, नाटककार, पटकथा लेखक, समीक्षक व पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलं, त्यांनी अनेक भूमिका निभावल्या. त्यांच्या सहा कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
१९५८ च्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी असे म्हटले, की गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजाच्या निर्मितीसाठी गंगेप्रमाणे निर्मळ असणाऱ्या साहित्याचा उपयोग व्हावा. ही त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा व त्यांचे स्वप्न आपणाला आज पूर्ण करावयाचे असेल तर त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये आपण सर्वांनी संकल्प करून कामाला सुरुवात केली पाहिजे. अशा महान साहित्यिकाचे १८ जुलै १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी जपलेली जीवनमूल्ये आपणही स्वीकारूयात व आपला समाज एकसंध व समरस बनवूयात, हीच खर्या अर्थाने अण्णाभाऊंना श्रद्धांजली ठरेल.
▪️▪️▪️▪️▪️▪️
– डॉ सचिन वसंत लादे
मो. ७५८८२१६५२६