“समाजाला आत्मभान देणारा लोकशाहीर- अण्णा भाऊ साठे”

लेख
Spread the love

★ साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यापासून नेहमीच वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन जगासमोर आणून आपला समाज, आपली माणसं, त्यांचं जगणं हे सारं साहित्याचा विषय बनवण्यासाठी आपली प्रखर लेखणी अहोरात्र झिजवली. #साहित्य हे समाजजीवनाचे प्रमुख अंग असून त्यामध्ये समाजजीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे, वास्तव परिस्थितीचे जिवंत दर्शन जगाला घडवले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी साहित्याचा मळा फुलवला. “मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्याबाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो” अशी प्रांजळ आणि प्रामाणिक कबुली देणारे अण्णा भाऊ म्हणूनच मनापासून भावतात.

  ★त्यांची जीवनावर अपार श्रद्धा होती. केवळ मनोरंजनासाठी साहित्यनिर्मिती असू नये, असा महत्वाचा विचार त्यांनी तमाम साहित्य जगताला दिला. ते आपल्या लेखणीतून सातत्याने दलित, वंचित, पीडित, उपेक्षित, बहिष्कृत आणि अन्यायग्रस्त माणसाची व्यथा-वेदना मांडत राहिले.

  ★दीड दिवसच शाळेचे तोंड पाहिलेल्या अण्णा भाऊंनी आपल्या अफाट आणि विलक्षण प्रतिभेने ३५ कादंबर्‍या, १३ कथासंग्रह, १३ लोकनाट्ये, ३ नाटके, १५ पोवाडे, १ शाहिरी पुस्तक, ७ चित्रपट आणि १ प्रवासवर्णन लिहून साहित्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण मर्दुमकी गाजवली.

  ★आजवर जो तळागाळातील माणूस साहित्याचा विषय कधीच झाला नव्हता त्या दीनदुबळ्या, दु:खी, कष्टकरी माणसाला त्यांनी आपल्या कथा-कादंबरी-नाटकांचा नायक बनवलं. ५,००० वर्षांच्या संस्कृतीत अन्यायग्रस्त माणसाच्या दु:खाला जगाच्या वेशीवर टांगण्याचं धैर्य अण्णा भाऊंनी दाखवलं. समतायुक्त समाजाच्या निर्मितीसाठी, स्वातंत्र्य, समता, न्याय, आत्मसन्मान आणि आर्थिक समतोल निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे, बंडखोरी करणारे, धाडसी, करारी, शूरवीर आणि स्वाभिमानी नायक त्यांनी रेखाटले. #फकिरा, सत्तू भोसला, हिंदराव, मास्तर या सर्व बंडखोर आणि क्रांतिकारी माणसांना आपल्या साहित्यातून अजरामर केले. साहित्यातून #समाजप्रबोधन आणि त्यातून #समाजपरिवर्तन हेच त्यांच्या साहित्याचे सूत्र असल्याचे दिसते.

  ★१९५२ साली झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना ते आपल्या साहित्याच्या जाणिवा स्पष्ट करतात, “दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्यासारख्या एका दलितानं करावं, हा अपूर्व असा योग असला तरी आचार्य अत्रे यांचे हे कार्य मी करीत आहे, याची मला जाणीव आहे. ‘दलित साहित्यिकांचे वेगळे संमेलन भरवून हा वेगळा सवतासुभा का उभा करता ?’ असा प्रश्न काही मंडळी करत आहेत. काहींच्या मते, अस्पृश्यता निवारण करणारा कायदा अस्तित्वात असल्यामुळे आज दलित हा शद्बच निरर्थक झाला आहे. सर्व काही ठीक आहे. पण हा प्रश्न निर्माण करणारे दलितांना माणूस म्हणून मानतात, परंतु त्या दलितांचा एक वर्ग आहे, ही गोष्ट ते मान्य करत नाहीत. त्यामुळेच वरील प्रश्न निर्माण झाला आहे, होत आहे. केवळ महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तरी दलितांचा मोठा वर्ग या देशात अग्रेसर असून, त्याच्या न्याय्य संघर्षाचे परिणाम सर्व 

समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक पाया आहे. परंतु तो, पिळला जाणारा आणि कष्ट करणारा दलित म्हणून वेगळा आहे, उपेक्षितही आहे. अशा या दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. साहित्य हे आरशासारखे स्वच्छ असावे. त्यात आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसावं, एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा असं वाटणं गैर नाही. कारण तरंगमय तळ्यात पडलेली सावली जशी लांबुळकी आणि डगमगती दिसते, तद्वत आजचा दलित आजच्या साहित्यात दिसतो.” असे वर्णन आपल्या मनोज्ञ भूमिकेतून #अण्णाभाऊ करतात.

  ★हजारो वर्षे गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसलेल्या दलित, पददलित, वंचित आणि पीडित समाजाला बाहेर काढण्यासाठी व पोलादी साखळदंडांनी बंदिस्त जीवन जगत असलेल्या आणि मनस्वी वेदनेने व्याकुळ झालेल्या शोषित समाजाला शोषणमुक्त आणि समतायुक्त जीवनानुभव देण्यासाठी अण्णा भाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य समाजपरिवर्तनासाठी झिजवले. देशभर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे जोरदार पडघम घुमत असताना अण्णा भाऊंच्या लेखनाला सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याचा लढा राष्ट्रीय नेते पुढे पुढे रेटत नेत होते. अण्णा भाऊ आपल्यातील सृजनशक्ती त्या गाड्याला अधिक प्रगत, गतिमान करण्यासाठी हिरीरीने वापरत होते.

  ★आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी #स्वातंत्र्य मिळाले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी भाषावार प्रांतरचना करण्याचे तत्कालीन राजकीय नेतृत्वाने ठरवले. १ मे १९६० रोजी #महाराष्ट्र हे राज्य म्हणून अस्तित्वात आले. मुंबई हे बेट गुजरात राज्यात ठेवावे की महाराष्ट्रात, याबाबत अनेक वाद झाले. बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव हे मराठी भाषक प्रदेश महाराष्ट्रापासून वेगळे करून ते शेजारच्या कर्नाटक आणि गुजरात राज्यांत समाविष्ट करण्यात आले. महाराष्ट्राने तत्कालीन केंद्र शासनाच्या या निर्णयाविरुद्ध अतिशय तीव्र आंदोलन केले आणि त्यामुळे राज्याच्या पुनर्रचनेच्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिळाली. या ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात’ अण्णा भाऊंची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. #संयुक्तमहाराष्ट्र चळवळ, बेळगाव-कारवार सीमावाद या आंदोलनांमध्ये हिरीरीने भाग घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर अण्णा भाऊंनी सर्वसामान्य जनांना आपल्याभोवतीच्या राजकीय घडामोडींबद्दल जागृत आणि सजग करण्याचे मोठे कार्य केले.

  ★अण्णा भाऊंची शाहिरी केवळ कम्युनिस्ट विचारसरणी वा कामगार चळवळ यापुरतीच सीमित नव्हती, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासही अतिशय प्रभावीपणे त्यांच्या लेखणीला खुणावत होता. इंग्रजांनी आपली विस्तारवादी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या देशातील जातींचा आणि आपापसातील मतभेदांचा धूर्तपणे उपयोग करून जो मानवी संहार घडवून आणला, त्या संदर्भातील अण्णांनी केलेले लिखाण हृदयाला पिळवटून टाकणारे आहे. त्यांच्या १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून ते १९४२ चे चलेजाव आंदोलन, १९४६-४७ चे इंग्रजविरोधी जनआंदोलन त्यांच्या ‘पंजाब दिल्ली दगा’ या पोवाड्यातून प्रकट होते.

  ★भारतातील ५६६ संस्थानिकांपैकी हैदराबादच्या निजाम सरकारच्या कलंकित कृत्यांचा कारनामा अण्णांच्या ‘तेलंगणाचा सग्राम’ या पोवाड्यातून दिसतो. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा बिमोड आणि नि:पात करण्यासाठी निजामाने त्याच्या सैन्याचा पुरवठा इग्रजांना केला होता. तसेच त्याने १९४२ च्या #चलेजाव आंदोलनात सहभागी झालेल्या भारतीयांना तुरुंगात डाबून ठेवले होते. तसेच १९४६ मध्ये कामगारांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराची मदत पाठविली होती. निजामाच्या सैनिकांनी गोरगरिबांच्या घरात घुसून भयंकर लूट करत महिलांवर अत्याचार केले. निजामाच्या श्वापदी वृत्तीची साक्ष देणाऱ्या या अमानुष आणि क्रूर घटना अण्णा भाऊंनी प्रत्ययकारकतेने आपल्या लेखणीतून उतरविल्या आहेत.

  ★अण्णा भाऊंच्या लेखणी आणि शाहिरीला कोणत्याही प्रादेशिक मर्यादा नव्हत्या. त्यांनी रशियाचा प्रवास करून आल्यानंतर जागतिक पातळीवरील कामगार चळवळीचा विवेचनात्मक अभ्यास करीत चिंतन केले. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या, दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी जर्मनीच्या सैन्याने रशियाच्या जनतेवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचे वर्णन करणाऱ्या ‘स्टॅलिनय्राडच्या पोवाड्या’तून आणि १ मे १९२९ या दिवशीच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने जमलेल्या कामगारांवर भांडवलदारांकडून झालेल्या रक्तरंजित अमानुष कृत्याचे कथन करणाऱ्या ‘बर्लिनच्या पोवाड्या’तून तसेच चीनमधील कामगार चळवळीवर झालेल्या अमानुष अत्याचारांची गंभीर नोंद घेतलेल्या ‘चिनीजनांची मुक्तिसेना’ या पोवाड्यातून येते.

  ★अण्णा भाऊंनी आपली लेखणी खऱ्या अर्थाने सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी झिजवली. मराठी संस्कृती आणि आपला महाराष्ट्र यांच्यावरील गीते, #पोवाडे रचले. या सर्व रचनांमधून उत्स्फूर्तता, जोश, जाज्वल्य देशाभिमान इत्यादींबाबत भरभरून लिहिले. मराठी भाषा, संस्कृती, महाराष्ट्र, मायभूमी याबद्दलची ओढ, अपार प्रेम आणि श्रद्धा त्यांच्या प्रत्येक शद्बा-शद्बातून व्यक्त होत राहिली.

या रचनांमध्ये – शाहिरांनो, महाराष्ट्र देश आमुचा, उठला महाराष्ट्र देश, महाराष्ट्रावरती टाक ओवाळुनी काया, माझी मैना गावाकडे राहिली, जग बदलुनी घाव या गीत शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला.

  ★#लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर #अमरशेख आणि शाहीर द. ना. गव्हाणकर या शाहिरत्रयीच्या अलौकिक, जोशपूर्ण आणि वीरश्रीयुक्त गायनाने समाज जागृती आणि प्रबोधनाचे फार मोठे प्रभावी कार्य महाराष्ट्रभर केले.

  ★महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची, श्रमिकांची, शेतकरी-कष्टकऱ्यांची आणि संत-पंत आणि तंतांची आहे. पराक्रमी असलेल्या मराठी भाषकांचा महाराष्ट्र खंडित झाला आहे. मराठी भाषकांच्या भूभागावर अन्य भाषकांची मालकी आहे. तेव्हा खंडित झालेला महाराष्ट्र पुन्हा अखंड करण्यासाठी शौर्याची, स्वाभिमानाची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा असलेल्या मराठी जनांना रणमैदानात उडी घेण्याचे आवाहन करत, त्यांना कृतिप्रवण करण्याचे काम अतिशय धडाडीने अण्णा भाऊ करतात.

  ★अण्णा भाऊंनी ‘महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया’ ही रचना #संयुक्तमहाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिहिली. आपल्या समृद्ध परंपरेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील जनतेने संयुक्त महाराष्ट्रासाठी संपूर्ण ताकदीनिशी लढावे. मृत्यूला तोंड द्यायची वेळ आली, तरी आपले पाऊ्ल मागे घेऊ नये, असे आवेशपूर्ण आवाहन अण्णा भाऊ आपल्या जीवाभावाच्या बंधू-भगिनींना आपल्या कवनातून करतात. मराठी प्रांत आणि त्यातल्या माणसांच्या शौर्याची गौरवगाथा कथन करणाऱ्या ‘उठला मराठी देश’ या गौरव गीतालाही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी या मागणीसाठी मुंबईच्या रस्त्यावर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांची स्तुती या गीतामधून अण्णा भाऊ करतात. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठी मुलुखाला, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी बळ कसे मिळते, त्याच्यात उत्साह कशाप्रकारे संचारतो, त्याचे शौर्य कसे पणाला लागते याचे यथार्थ वर्णन अण्णा भाऊ करतात.

  ★कोणत्याही कलावंताने आपली सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत राहिले पाहिजे, या विचारांचे कृतिशील पुरुष म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ! समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्याच्या न्याय्य हक्कासाठी हातात डफ घेऊन अण्णा भाऊंमधला लढवय्या कार्यकर्ता रस्त्यावर उतरला, स्वतःची उत्तुंग प्रतिभा समाजाच्या कल्याणासाठी प्रकाशमान केली.

  ★भारतीय मातीतला चेहरा असलेला सामान्य माणूस अण्णा भाऊंच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होता. महाराष्ट्रावर अपार प्रेम करणाऱ्या अण्णांनी जीवापाड मेहनत करुन या मातीतील, ज्वलंत, जिवंत आणि रसरशीत साहित्य भरभरून लिहिले. म्हणूनच इथल्या समाजजीवनाशी समरस झालेल्या ‘अण्णा भाऊंची लेखणी, जगात देखणी’ असेच म्हणावे लागेल. त्यांचे साहित्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेच, परतु ते जात-धर्माच्या व देशकालाच्या सीमा ओलाडून इंग्रजी, जर्मन, झेक, रशियन, स्लोव्हाक आणि पोलिश या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले. असे साहित्यिक यश आणि भाग्य केवळ अण्णा भाऊंच्या साहित्याला लाभले, यातून खऱ्या अर्थाने त्यांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व समोर येते. 

  ★कोणत्याही प्रकारची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी केलेले कार्य सामान्य माणसाला स्तिमीत करणारे आहे. भारताचे नाव त्यांनी आपल्या साहित्यकृतीने सुशोभित केले आहे.  

  ★’जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ असे गर्जत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी मानणाऱ्या, तथाकथित उपेक्षित समाजात जन्मलेल्या आणि अंगभूत कर्तृत्वाने पददलित समाजाला आत्मभान देणार्‍या आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सामाजिक समतेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या जागतिक साहित्यकाराचा यथोचित सन्मान होणं अजूनही बाकी आहे.  

  ★स्व. अण्णा भाऊंना जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन !

★लेखक : –

डॉ. सुनील दादोजी भंडगे 

(प्रमुख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *