पुणे–शिवसेनेतील बंडामागे भाजप नाही. राज्य सरकार स्थिर आहे, की अस्थिर आहे याकडे आमचे लक्षही नाही. आम्ही आमची कामे करत आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आसामचे मंत्री बंडखोर आमदारांच्या हॉटेलवर काय करतात? ‘ असे विचारले असता, “त्याची कल्पना नसून, ही माहिती तुमच्याकडूनच समजते, ‘ असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेना आमदारांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले असून, त्यात भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे. यावेळी बडोदा येथे केंद्रीय मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याचे बोलले जाते, असे पाटील यांना विचारले असता, ही माहिती मला तुमच्याकडूनच कळते असे सांगितले. फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, “फडणवीस यांच्या दिल्ली भेटी नियमित आहेत. माध्यमांना आता त्या लक्षात येत आहेत. फडणवीस यांच्या कामाला वेग आहे. ते त्यांना हवी असलेली बैठकीची वेळ मिळाली की उद्या जाऊ, परवा जाऊ असे न करता रात्री-बेरात्री निघतात. त्यांच्या बैठका नेहमीच जास्त होतात. ‘
राज्यात स्थिर सरकार द्यायला भाजप पुढे येणार का? यावर पाटील म्हणाले, “भाजपने भूमिका स्पष्ट करावी अशी कुठलीही गोष्ट अजून घडलेली नाही. जे चालले आहे, त्याकडे आम्ही राजकीय पक्ष म्हणून पाहत आहोत. सरकारच्या स्थिरतेबद्दल बोलण्यासारखे सध्या काहीच घडलेलं नाही.