पुणे-पूर्वीच्या काळी एखाद्या निर्णयाचे समाजहित पाहून माध्यमे ती भूमिका पुढे रेटत असत, महात्मा फुले हे पत्रकार होते आणि त्यांनी अनेक सामाजिक भूमिका आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पुढे नेल्या. आताची पत्रकारिता मात्र ग्राहककेंद्री आणि कॉर्पोरेट पत्रकारिता झाली आहे असे विचार पत्रकार व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित ‘महात्मा फुले यांच्या विचार कार्याची प्रस्तुतता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात चोरमारे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू प्रा.एन.एस.उमराणी, कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता प्रा. संजीव सोनवणे, प्रा. पराग काळकर, महात्मा फुले अध्यासन प्रमुख विश्वनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुख प्रा. मनोहर जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चोरमारे म्हणाले, अंधश्रद्धा निर्मुलन कायदा होण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर हे प्रत्येक वृत्तपत्राकडे जात त्यामागची भूमिका मांडत, वास्तविक हे समाजभान ओळखून पत्रकारांनीच याला पुढे आणणे गरजेचे होते परंतु तसे होताना दिसले नसल्याची खंतही चोरमारे यांनी यावेळी व्यक्त केली.
महात्मा फुलेंच्या विचारांवर केवळ चर्चा घडवून आणणे एवढ्यावरच न थांबता त्यांच्या विचारावर कसे काम करता येईल हा विद्यापीठाकडून कायमच आम्ही प्रयत्न केला आहे. हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवत त्यातून विधायक कृती घडावी यासाठी आमचा आग्रह आहे असे, प्रा. नितीन करमळकर म्हणाले.