पुणे- पुण्यातील बालेवाडी येथून भरदिवसा दुचाकीवरून अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला आहे. चिमुरड्याला अपहरणकर्ताच सोडून पसार झाला आहे. त्यानंतर तो सापडला आहे.
स्वर्णव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गेल्या आठवड्यात (दि. ११ जानेवारी) स्वर्णवचे अपहरण झाले होते. त्याचे वडिल डॉक्टर आहेत. आई देखील मेडिकल फिल्डमध्ये काम करत असून, त्यांची स्वत:ची लॅब आहे. दरम्यान, स्वर्णवला त्याचा १४ वर्षांचा मामा शाळेत सोडण्यास घेऊन जात होता. यादरम्यान, शाळेत जातेवेळी चार वर्षीय मुलाचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले होते. काही वेळाने हा प्रकार उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
दिवसभर पोलीसांनी शोध घेतल्यानंतर त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. दरम्यान, त्यानंतर एक-एकदिवस शोध मोहिमेचा सुरू झाला आणि सर्वांचेच धाबे दणाणले. या मुलाला एका दुचाकीवरून नेण्यात आले होते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. परंतु, त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल आठ दिवसांपासून निम्मे पोलीस दल त्याचा शोध घेत असताना देखील कोणताही क्लू पोलीसांना मिळत नव्हता.
दरम्यान, आज अपहरण कर्त्यानेच या मुलाला पुनावळे परिसरातील एका कंपनीजवळ आणले. येथे एक कामगरा बसलेला होता. त्याच्याकडे या मुलाला सोडले आणि मी दहाच मिनिटांत वापस येतो, असे म्हणून निघून गेला. पण, तो बराच वेळत आला नाही. तर, मुलगा देखील रडू लागल्याने त्या कामगाराने त्याची पिशवी पाहिली. त्यात मोबाईल क्रमांक मिळाला. त्याने संपर्क साधला. त्यावेळी पालकांनी ही माहिती पोलीसांना दिली. तसेच, मुलगा तोच आहे का हे व्हॉटसअप व्हिडीओ कॉलकरून खात्री केली आणि त्याला घेण्यासाठी धाव घेतली.