पुणे – पुण्यातील कात्रज परीसरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर घडली.
समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचा पदाधीकारी होता. आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नुकतेच त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चौकात आला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी समीरवर सहा गोळ्या झाडल्या. यामध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा थरार घडला आहे. दरम्यान, शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.
मृत समीर हा बांधकाम व्यावसायिक होता. आर्थिक देवाणघेवाणीतून जुन्या सहकाऱ्याने बांधकाम व्यावसायिकाचा खून केला आहे. मारेकरी आणि बांधकाम व्यावसायिक हे जनता वसाहतीमधील रहिवाशी आहेत. आर्थिक देवाणघेवाणीमधून हा खून झाला आहे. यापूर्वी अटकेतील व खून झालेल्या व्यक्तीवर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.