पुणे–कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या बहुतांश भागांत पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रविवारपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागांतून तो परतेल, अशी शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. पुढील पाच दिवस कोकण व गोव्याच्या बहुतांश भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच भागात पाऊस होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज आहे. याशिवाय मराठवाडा व विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या साप्ताहिक अंदाजानुसार 14 ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. तर दुसऱया आठवडय़ात म्हणजेच 15 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडय़ातील जिल्हय़ांमध्ये सरासरीइतक्या पावसाची शक्यता आहे.